सांगवी (बारामती) : अलीकडील काळात अल्पवयीन मुलांचा सोशल मीडियावरील वापर अधिक घातक ठरू लागल्याचे समोर आले आहे. इंस्टाग्राम पेज चालवणारी काही मुलं परिसरातील मुलींना लक्ष्य करत आहेत. मुली सुरक्षित नसून त्यांना ब्लॅक मेलिंग करण्याचा नेहमीच प्रकार समोर येत असतो. यात अल्पवयीन मुली अधिक बळी पडू लागल्या आहेत. मोबाईलवर ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली अनेक पालकांना आपली मुलं सोशल मीडियावर आभासी जीवन जगत असल्याची माहितीच नसते,मात्र जेव्हा धक्कादायक बाबी समोर येऊन मुलांचे बिंग फुटते, तोपर्यंत मात्र,फार उशीर झालेला असतो, असाच एक प्रकार बारामती तालुक्यातून समोर आला आहे.
इन्स्टाग्रामवर फेक आयडी बनवून अल्पवयीन शालेय विदयार्थीनीचा फोटो व अश्लिल मजकुराची स्टोरी व्हायरल केल्याची घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे. मुलीची बदनामी करणाऱ्या त्या युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली असून माळेगाव पोलीसांनी अखेर युवकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवन राजेंद्र क्षिरसागर (वय २१) रा. ढाकाळे (ता. बारामती जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनी स्वतःच्या इन्स्टाग्राम आयडी वर कुटुंबीयांचे फोटो शेअर केले होते. त्याच फोटोचा स्क्रीन शॉट काढून फोटोचे वापर करत पवन क्षीरसागरने नवीन इन्स्टाग्राम आयडी उघडून नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलीचे फोटो व त्यावर अश्लील, लज्जास्पद लिखाण करून ते व्हायरल केले होते.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या सुचनेनुसार पोलीस नाईक संदीप सानप यांनी इन्स्टाग्राम व फेसबुक या समाजमाध्यम चालविणाऱ्या मेटा प्लॅटफॉर्म या अमेरिकास्थित जागतिक कंपनीच्या कार्यालयाकडे संबंधित इन्स्टाग्राम खात्याची माहीती मिळणेकामी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार त्यांच्या कार्यालयाकडून माहीती प्राप्त करुन घेतली, माहीतीच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. मात्र,यापुढे मुलींनी सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
माळेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राच्या गावातील इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन शालेय मुलीचा फोटो वापरुन त्या फोटोवर तीच्या चारित्र्या विषयी बदनामी होईल, असे जाणीवपुर्वक अश्लिल स्वरुपाचे मजकुर लिहुन त्याची इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवल्याचा प्रकार संबंधित शालेय विदयार्थिनीच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आला. त्यानुसार विदयार्थिनीच्या वडीलांनी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानुसार माळेगाव पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदविला होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता. गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन तपासी अधिकारी वैशाली पाटील यांनी तपास पथक तयार केले होते. आरोपीस बारामतीच्या न्यायालयात हजर केले असता गुन्हयाच्या पुढील चौकशीसाठी (दि. १ एप्रिल) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.