रुपाली चाकणकर यांच्याबाबत बदनामीकारक पोस्ट; ४ जणांवर गुन्हा दाखल, एक निघाला मनोरुग्ण
By नम्रता फडणीस | Updated: December 5, 2023 16:31 IST2023-12-05T16:29:53+5:302023-12-05T16:31:55+5:30
जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रुपाली चाकणकर यांच्याबाबत बदनामीकारक पोस्ट; ४ जणांवर गुन्हा दाखल, एक निघाला मनोरुग्ण
पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्द्ल सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकून त्यांची जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
विकास सावंत, जयंत पाटील, रणजित राजे हट्टींमबिरे आणि अमोल के. कुटे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भाऊ संतोष बबन बोराटे यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्हयाच्या तपासाविषयी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जयंत पाटील, रणजित राजे हट्टींमबिरे आणि अमोल के. कुटे यांच्या मोबाईल क्रमांकांची माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीचे विश्लेषण करून संशयित जयंत रामचंद्र पाटील हा सांगलीतील धनगरवाडी परिसरात रहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबरचे एक पथक २४ नोव्हेंबर ला त्या ठिकाणी रवाना झाले. त्याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान तो मानसिक रुग्ण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्याला सी आरपीसी ४१ (अ) (१) प्रमाणे नोटीस दिली असून, त्याचा जबाब नोंद करून मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच वसंत रमेश खुले (वय ३४ जि .परभणी) व प्रदीप कणसे या दोघांनाही चाकणकर यांच्या पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
गुन्हयाचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे, विद्या साबळे, पोलीस शिपाई संतोष जाधव, पोलीस शिपाई दिनेश मरकड , पोलीस शिपाई श्रीकृष्ण नागटिळक , उमा पाळावे, पोलीस हवालदार सुनील सोनोने या पोलीस पथकाने पार पाडली.