पुणे: पुण्यात जीबीएस आजाराचे एकाच दिवसात २८ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्य आता १०१ वर पोहोचली आहे. त्यामध्ये 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पिंपरीत एका महिलेचा गुइलेन-बॅरे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) आजार झाल्यावर मृत्यू झाला होता. मात्र ती महिला न्यूमोनिया झाल्याने दगावल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. आता मात्र जीबीएसमुळे पुण्यात दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील धायरी परिसरातील 40 वर्षीय व्यक्तीला या आजाराची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
आता पर्यंतचे जीबीएस रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले होते. या अहवालात मूळ कारण निष्पन्न झाले असून, दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरल्याने रुग्णांना बाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही रुग्णांना ‘कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू आणि काही रुग्णांमध्ये ‘नोरो व्हायरस’ हा विषाणू संसर्ग आढळून आला आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हींची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आहेत. ‘जीबीएस’चा सर्व्हे आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.
घाबरू नका; परंतु त्वरित वैद्यकीय मदत घ्या
गुइलेन-बॅरे सिंड्रोम गंभीर असू शकतो; परंतु योग्य उपचारांनी लोक बरे होऊ शकतात. ही एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामुळे हातपाय, मान, चेहरा आणि डोळे कमकुवत होतात. त्यामुळे मुंग्या येणे किंवा बधिर होणेदेखील होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये चालणे, गिळणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणेदेखील होऊ शकते. जर स्नायूंमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवला तर घाबरू नका; परंतु त्वरित वैद्यकीय मदत घ्या असे डॉक्टरांनी सांगितले आहे. योग्यवेळी उपचार घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अशा रुग्णांवर आयव्हीआयजी किंवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे बरे होण्याची शक्यता वाढते आहे, हे सिद्ध झाले आहे. यामुळे दूषित अन्न खाणे बंद करावे. पाणी स्वच्छ आणि जंतुविरहित असावे. या संसर्गामुळे जुलाब आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे देखील होऊ शकतात असेही डोक्टर म्हणाले आहेत.