पुणे: पुणे ते अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे. या समांतर रेल्वे मार्गाच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल (डीपीआर) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. कंपनीने सादर केला आहे. ९८ किलोमीटरचा हा मार्ग दुहेरी असणार आहे. हा मार्ग पुणे ते अहिल्यानगर या राष्ट्रीय मार्गाला समांतर असल्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गावर एकूण १२ रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहेत. आता बसने पुण्याहून नगरला तीन ते चार तास लागतात. ते अंतर या रेल्वेमुळे निम्मे होऊन दीडतासामध्ये नगरला पोहचता येणार आहे.
पुणे स्थानकावरून उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या आता दाैंड स्थानकावरून धावतात. दरम्यान, यात प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. शिवाय, वळसा घालून जावे लागते. तसेच पुणे ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. त्यामुळे महामार्गाला समांतर रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी डीपीआर तयार केला आहे. या प्रकल्पाबरोबरच रेल्वे मार्ग वाढविण्याचे नियोजन आहे. त्यानुसार तळेगाव ते उरुळी आणि पुणे ते अहिल्यानगर अशा दोन नवीन मार्गांवर रेल्वे जाळे विस्तारण्याचे काम रेल्वे बोर्डाकडून हाती घेण्यात येणार आहे. तळेगाव ते उरुळी हा बाह्यवळण मार्ग करण्याचे नियोजन होते, पण आता तो मार्ग दुहेरी करून तोच तिसरी व चौथी मार्गिका असणार आहे. त्याचाही आराखडा कोकण रेल्वेने तयार केला आहे. पुणे ते अहिल्यानगर या दुहेरी मार्गावर १२ रेल्वे स्टेशन असणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. प्रस्तावित रेल्वे मार्गावर १६० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावेल. हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हाती घेण्यात आला आहे.
प्रकल्पात एवढी जमीन जाणार (हेक्टर)
- एकूण जमीन - ७८५.८९८- खासगी जमीन - ७२७.९२५- सरकारी जमीन - १३.०१६- वनजमीन - ४४.९५६
ही आहेत प्रस्तावित रेल्वे स्थानके
लोणी काळभोर, कोलवडी, वाघोली, वढू, जातेगाव, रांजणगाव एमआयडीसी, कोहकडी, सुपे एमआयडीसी, कामरगाव, चास आणि अहिल्यानगर ही प्रस्तावित स्थानके आहेत. यामधील रांजणगाव आणि सुपे एमआयडीसी रेल्वे स्टेशन मुख्य स्थानक असणार आहे.
शिरूर तालुक्यातील सर्वाधिक जमीन जाणार
पुणे ते अहिल्यानगर दरम्यान ९८ कि. मी.चा महामार्ग समांतर दुहेरी रेल्वे मार्गासाठी हवेली, शिरूर, पारनेर आणि अहिल्यानगर या चार तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन होणार आहे. यासाठी सर्वाधिक जमीन शिरूर तालुक्यातील जाणार असून, त्यांनतर पारनेर आणि अहिल्यानगर तालुक्यातील जमीन जाणार आहे.
दुहेरी मार्गाची प्रमुख वैशिष्ट्ये
- एकूण लांबी : ९८.५७५ कि. मी.- तालुके : हवेली (६.७० कि. मी.), शिरूर (३८.८७५ कि. मी.), अहिल्यानगर (५३.१४५ कि. मी.)- वेग मर्यादा : १६० कि. मी./तास- कालावधी : ४ वर्षे- एकूण जमीन : ७८५.८९८ हेक्टर