Now let's next number in transfer ? talk in the administration and political circles | बदल्यांसाठी आता पुढचा नंबर कुणाचा ? प्रशासन, राजकीय वर्तुळात चर्चा

बदल्यांसाठी आता पुढचा नंबर कुणाचा ? प्रशासन, राजकीय वर्तुळात चर्चा

ठळक मुद्देविभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी रांगेत अजितदादा यांना आपल्या स्टाईलनुसार काम करणारे अधिकारी हवे असतात. पहिल्या टप्प्यातील बदल्यानंतर आता पुढील बदल्या कुणाच्या याच्या जोरदार चर्चा

पुणे : राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरु झाली होती. या चर्चेनुसार गेल्या आठ दिवसांत पुण्यासह राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या. यामध्ये पहिल्याच टप्प्यात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, पुणे महापालिका आयुक्त यांचा नंबर लागला. यामुळे बदल्यासाठी आता पुढचा नंबर कुणाचा याची चर्चा प्रशासन आणि राजकीय वर्तुळात सुरु आहे. यामध्ये विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी याचा नंबर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    पुण्याचे पालकमंत्री पद अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आले. अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पुण्यातील सर्वच विभागांच्या अधिका-यांचे धाबे दणाणले. अजितदादांनी आपल्या स्टाईलनुसार आठ दिवसापूर्वी सकाळी नऊ ते सायंकाळी सात, साडेसात पर्यंत जिल्हा नियोजनसह अनेक विभागाच्या मॅरेथॉन बैठका घेऊन आपल्या कामाचा झपाटा दाखवून दिला. याच मॅरेथॉन बैठकीत अधिकाऱ्यांच्या कामाचा उरक देखील त्यांच्या लक्षात आला. याचा पहिला मोठा झटका पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी उदय जाधव यांना बसला. याच बैठकीमध्ये तिर्थक्षेत्र विकास आराखड्यावरून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देखील आराखड्याची कामे वेळेत व दर्जेदार करण्यासाठी स्वत: लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. पुणे जिल्ह्यांमध्ये बहुतेक सर्व महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अजित पवार यांचे विशेष लक्ष असते. अजितदादा यांना आपल्या स्टाईलनुसार काम करणारे अधिकारी हवे असतात. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या त्यांनी बदल्या देखील केल्या आहेत.
    पहिल्या टप्प्यातील बदल्यानंतर आता पुढील बदल्या कुणाच्या याच्या जोरदार चर्चा प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहेत. यामध्ये विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या देखील नावाची चर्चा आहे. परंतु म्हैसेकर येत्या जुलै महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. यामुळे त्याची बद्दली होणार की सहा महिन्ये संधी देणार हा महत्वाचा विषय आहे. परंतु यापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विकास देशमुख यांच्या देखील सेवानिवृत्ती जवळ असताना बदल्या झाल्या आहेत. यामुळे म्हैसेकर यांच्या बदलीकडे देखील प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष  लागले आहे. याशिवाय संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासकीय चेहरा म्हणून पाहिले जाणारे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्या नावाची देखील बदलीसाठी चर्चा सुरु आहे. दरम्यान नव्याने नुकतेच एखाद्या पदावर बदलून आलेल्या अधिका-यांच्या कामाचा उरक अजित दादांना न पडल्यास संबंधित अधिका-यांची देखील उचलबागडी होऊ शकते. यामुळे सध्या सर्वच विभागातील अधिका-यांमध्ये बदलीची धास्ती निर्माण झाली आहे. 

Web Title: Now let's next number in transfer ? talk in the administration and political circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.