''कांदा कापून नाही तर कांद्याचे भाव पाहून डाेळ्याला पाणी'' ; जेजुरीच्या हाॅटेलमधील पाटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 19:32 IST2019-12-05T19:31:06+5:302019-12-05T19:32:32+5:30
कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कांदा चिरुन नाहीतर कांद्याचे भाव पाहून डाेळ्यात पाणी येत आहे अशी पाटी एका हाॅटेल चालकाने आपल्या हाॅटेलमध्ये लावली आहे.

''कांदा कापून नाही तर कांद्याचे भाव पाहून डाेळ्याला पाणी'' ; जेजुरीच्या हाॅटेलमधील पाटी
पुणे : बाजारात कांदा उपलब्ध हाेत नसल्याने कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यात सध्या किरकाेळ बाजारामध्ये 130 ते 150 रुपयांपर्यंत कांद्याचे भाव गेले आहेत. त्यामुळे हाॅटेल चालकांची माेठी पंचायत झाली आहे. हाॅटेलमधील बहुतांश पदार्थांमध्ये कांदा वापरला जात असल्याने आता हाॅटेल चालकांनी विविध उपाय शाेधून काढले आहेत. कांदा मागताना हाॅटेलमधील ग्राहकांना कांद्याच्या भावाची कल्पना यावी म्हणून जेजुरीतील एका हाॅटेल चालकाने आपल्या हाॅटेलमध्ये कांद्यामुळे हाेणाऱ्या नागरिकांची अवस्था दर्शवणारी पाटी आपल्या हाॅटेलमध्ये लावली आहे.
''कांदा कापून डाेळ्याला पाणी येण्यापेक्षा कांद्याचे भाव गगणाला भिडल्याने डाेळ्यात पाणी येत आहे'' अशी पाटीच जेजुरीतील सदानंद हाॅटेलच्या मालकाने लावली आहे. हाॅटेलमध्ये विविध पदार्थांसाठी कांद्याची गरज असते. त्यावर सुद्धा हाॅटेलचालक विविध उपाय करत आहेत. कांदा भजीच्या ऐवजी पालक भजी आणि काेबी भजी देण्यात येत आहेत. तसेच भेळेमध्ये कांद्याऐवजी उकडलेली मिर्ची टाकण्यात येत आहे. मिसळ तसा सर्वांचा आवडता पदार्थ मिसळमध्ये माेठ्याप्रमाणावर कांदा घालण्यात येताे. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी करुन आता मिसळमध्ये काेथिंबिरीचे प्रमाण वाढविण्यात येत आहे.
सदानंद हाॅटेलचे मालक हरीदास रत्नपारखी म्हणाले, कांद्याचे दर दरराेज वाढत असल्याने हाॅटेल चालविताना अनेक अडचणी येत आहेत. पुण्या- मुंबईसारख्या माेठ्या शहरांना कांदा पाठविण्यात येत असल्याने ग्रामीण भागात कांदा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांद्याला इतर पर्याय देण्यात येत आहे. तसेच आम्ही कांद्याची सध्याची अवस्था दर्शवणारी पाटी देखील आमच्या हाॅटेलमध्ये लावली आहे.