रुग्णसेवेमध्ये मानवी संवेदनांची जागा कोणतीही यंत्रणा घेऊ शकत नाही - आरती सरीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:53 IST2025-04-25T11:52:35+5:302025-04-25T11:53:41+5:30

आज तुम्ही केवळ वैद्यकीय पदवीधर म्हणून नाही, तर भारतीय सशस्त्र दलातील गणवेशातील एक अधिकारी आहात.

No system can replace human emotions in patient care - Aarti Sarin | रुग्णसेवेमध्ये मानवी संवेदनांची जागा कोणतीही यंत्रणा घेऊ शकत नाही - आरती सरीन

रुग्णसेवेमध्ये मानवी संवेदनांची जागा कोणतीही यंत्रणा घेऊ शकत नाही - आरती सरीन

पुणे : एक अधिकारी म्हणून तुमचे वागणे आणि तुमचे निर्णय हेच तुमची खरी ओळख ठरतील. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे. मात्र, रुग्णसेवेमध्ये मानवी संवेदना आणि सहभाग यांची जागा कोणतीही यंत्रणा घेऊ शकत नाही. ‘एएफएमसी’ची परंपरा गौरवशाली आहे. आता ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, असे प्रतिपादन लष्करी वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक व्हाइस ॲॅडमिरल आरती सरीन यांनी व्यक्त केले.

पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) ५९ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा बुधवारी पार पडला. त्यावेळी त्यांनी छात्रांना मार्गदर्शन केले. यावेळी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि डेप्युटी कमांडंट मेजर जनरल गुरुराज सिंग, महाविद्यालयाचे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल पंकज पुरुषोत्तम राव आदी उपस्थित होते. व्हाइस ॲॅडमिरल सरीन म्हणाल्या, आज तुम्ही केवळ वैद्यकीय पदवीधर म्हणून नाही, तर भारतीय सशस्त्र दलातील गणवेशातील एक अधिकारी आहात. त्यामुळे आता तुमच्यावर केवळ उपचार करणाऱ्या डॉक्टरचीच नव्हे, तर समाजाला दिशा देणाऱ्या मार्गदर्शकाचीही भूमिका आहे. देशाला सर्वोच्च प्राधान्य देऊन जबाबदारी आणि निष्ठेने काम करावे, अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सारे जहाँ से अच्छा’ गाण्यावर छात्रांनी कदम ताल करत कॅप्टन देवाशीष शर्मा, कीर्ती चक्र परेड मैदानावर प्रवेश केला. प्रमुख पाहुण्या व्हाइस ॲॅडमिरल सरीन यांचे मैदानात आगमन झाल्यानंतर त्यांनी संचलनाची पाहणी केली. छात्रांच्या दिमाखदार संचलनानंतर त्यांना भारतीय सशस्त्र दलात अधिकारी म्हणून शपथ देण्यात आली. या संचलन सोहळ्याचे नेतृत्व सौरभ सिंग यादव यांनी केले. या समारंभात १२१ वैद्यकीय छात्रांनी सशस्त्र दलात अधिकारी म्हणून दाखल होण्याची शपथ घेतली. त्यामध्ये ९३ पुरुष आणि २८ महिला छात्रांचा समावेश आहे. त्यापैकी ९५ छात्र लष्करात, ११ नौदलात, तर १५ हवाई दलात दाखल झाले.

Web Title: No system can replace human emotions in patient care - Aarti Sarin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.