एकही जागा दिली नाही आणि एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्यासोबत काम करा तर तसंही आम्ही करू - रवींद्र धंगेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:17 IST2025-12-20T13:17:29+5:302025-12-20T13:17:45+5:30
पुणे महापालिकेच्या १६५ जागेचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला असून जेवढ्या जागा दिल्या जातील त्यावर आम्ही लढण्यास सज्ज आहोत

एकही जागा दिली नाही आणि एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्यासोबत काम करा तर तसंही आम्ही करू - रवींद्र धंगेकर
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदेगटाच्या युती संदर्भात दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यावर जागा वाटपावर प्राथमिक चर्चाही आहे. यावेळी शिवसेनेच्या वतीने पक्षाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, नाना भानगिरे तर भाजपकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना निमंत्रित केले नाही. मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटीलांवर केलेली सततची टीका त्यांना भोवली असून शिवसेनेच्या नेत्यांनीच धंगकेरांना बैठकीतून बाहेर ठेवण्याचा आदेश दिला असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे साहेब म्हणतील तो निर्णय अंतिम असल्याचे सांगितले आहे.
धंगेकर म्हणाले, मी महायुतीच्या बैठकीला जाणार नाही. शिवसेनेच्या बैठकीला जाणार आहे. शिंदे साहेबांनी मला शब्द दिला आहे. महायुतीची ती पहिली बैठक होती. अजूनही जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहेत. मी आणि प्रमोद नाना भानगिरे आम्ही दोघे मिळून पुणे महापालिकेच्या १६५ जागेचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. शिवसेनेची आज बैठक होणार आहे. जेवढ्या जागा दिल्या जातील त्यावर आम्ही लढण्यास सज्ज आहोत. शिंदे साहेब म्हणाले, त्यांच्याबरोबर काम करा तर आम्ही तसही करू. एकही जागा दिली नाही तरी आम्हाला शिंदे साहेबांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल.
...म्हणून महायुतीच्या बैठकीला बोलावले नाही
रवींद्र धंगेकर यांनी मध्यंतरी पुण्याची गुन्हेगारी कमी करण्याचा विडाच उचलला होता. निलेश घायवळ प्रकरणावरून त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. तर जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी महायुतीतील नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही माझ्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आता महायुतीतीलच नेत्यांना विरोध करणे त्यांना चांगलेच भोवले आहे.
दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीसाठी येत्या २३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तर भाजप, रिपाइं आणि शिवसेना (शिंदे गट) हे एकत्रित निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची आघाडी होणार की नाही यावर खल सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये मनेसचा समावेश होणार की मनसे स्वतंत्र लढणार या बाबतचा निर्णयही प्रलंबित आहे.