पुणे : पुण्यातील पब संस्कृतीला आमचा विरोध नाही, मात्र पबवर निर्बंध हवेत, असे मत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कॉपी विथ सीपी या कार्यक्रमात व्यक्त केले. पोलिस आरोग्य मित्र फाउंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिस आयुक्त म्हणाले, पोर्शे अपघात प्रकरणानंतर पालकांना असा धडा मिळाला आहे की, मुले आता घरी गाडी मागण्यासही धजावत नाही. कारण त्यांना माहिती आहे की, एका मुलाने दोघांचा जीव घेतला आणि त्याचे आईवडील आज जेलमध्ये आहेत. पब चालकांनी नियम पाळले नाही तर आम्ही केवळ कारवाईच करणार नाही तर त्यांना आयुष्यभर धडा मिळेल, असा आर्थिक दणका देऊ असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला.
ड्रग्जमुक्त पुणे करण्याचा निर्धार
कायद्याच्या विरोधात जे जातात त्याच्या विरोधात आमची भूमिका असते. पुण्यासारख्या शहरात काम करण्याची संधी मिळते यामध्ये आनंद आहे. विविध ठिकाणी २८ वर्षे काम केले, मात्र खरा गणपती उत्सव पुण्यातच अनुभवला. शहराला ड्रग्समुक्त करण्याचा निर्धार मनात ठेवून काम सुरू केल्यानंतर पुण्यातील ३६०० कोटींच्या ड्रग रॅकेटचा कशा पद्धतीने छडा लावला याबाबतही आयुक्तांनी आपला अनुभव सांगितला. गुन्हेगारांनी आणि पोलिसांनी कोणतीही कम्फर्ट असू नये ती दूर होणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
कायद्याच्या विरोधात गेला काही खैर नाही हे त्यांनाही कळून चुकले आहे. त्याबरोबर सायबर गुन्हे रोखण्यासाठी पुण्यात ही सुसज्ज प्रयोगशाळा व्हावी यासाठी देखील पाठपुरावा सुरू करण्यात येत आहे. पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, महिलांची सुरक्षा यांच्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत, असेही आयुक्त म्हणाले.
टेकड्यांवरील सुरक्षावर काम सुरू
पुण्यात अंधाऱ्या जागा जास्त आहेत. त्या जागा प्रकाशित व्हाव्यात त्या दृष्टीनेही आमचा महापालिकेसोबत पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल, असेही आयुक्त यांनी सांगितले. बोपदेव येथील बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील २२ टेकड्यांवर सुरक्षेच्या योजनेच्या अनुषंगाने काम सुरू असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.