पुणे: आयुष कोमकर खून प्रकरणानंतर पुण्यात गुन्हेगारीला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. अशातच कोथरूडमधील गोळीबाराच्या घटनेने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. कालच्या घटनेत सामान्य नागरिकावर किरकोळ कारणांवरुन गोळीबार झाला. यावरून आता पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नाही. तर पोलिसानांही नागरिकांची काळजी नसल्याचे दिसून येत आहे.
गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री कोथरूड भागात गोळीबार झाला आहे. यावरून असे दिसते की, गुंडांना आपली दहशत निर्माण करायची आहे. त्यांना आता पोलिसांचा धाक राहीला नाही. या गुन्हेगारी टोळ्यांचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच फिरावे लागत असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे. मागील वर्षीसुद्धा वनराज आंदेकर याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही घटना तर पुण्याच्या मध्यवर्ती भागात नाना पेठेत घडली. त्याच वर्षी शरद मोहोळ याची कोथरूड भागात हत्या करण्यात आली होती. आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीला सुरुवात झाल्याचे दिसते आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर काल घायवळ टोळीकडून सामान्य नागरिकावर गोळीबार झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागरपूरच्या दौऱ्यावर असताना पुण्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत विचारले असता त्यांनी या गुंडांना कडक शब्दात इशारा दिला आहे. अजित पवार म्हणाले, पुण्यात शहरीकरण, औद्योगिकीकरण, शिक्षण, आरोग्य सर्व काही वाढत आहे. मी आणि मुख्यमंत्री त्यावर लक्ष ठेवून आहोत. पुण्याची लोकसंख्याही आता वाढली आहे. अधिकचे मनुष्यबळ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुण्याचा सर्वत्र विकास होत आहे. अशातच पुण्यात होणारी कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांकडून मकोका लावले जातील. त्यांचा बंदोबस्त नक्कीच केला जाईल. आम्ही पुण्याची गुन्हेगारी आता गांभीर्याने घेतली आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
गुंडांवर कडक कारवाई व्हावी
पुण्यात सामान्य नागरिकावर गोळीबार झाल्याने सर्व पुण्यातच भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अशा गुंडांवर कडक कारवाई करावी. त्यांना पोलिसांचा धाक राहिला पाहिजे. सामान्य नागरिकाला अशा प्रकारे त्रास सहन करावा लागू नये. तसेच कोणीही भीतीच्या छायेत राहू नये. अशा प्रकारे पोलिसांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.