पुण्याहून नवीन विमानसेवा नाहीच; मागणी असून देखील स्लॉट वाढवून न मिळाल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:39 IST2025-10-28T10:39:47+5:302025-10-28T10:39:59+5:30
पुणे विमानतळाच्या हिवाळी वेळापत्रकात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढून अनेक नवीन शहर देखील विमानसेवेने जोडली जातील, ही पुणेकरांची मोठी आशा होती

पुण्याहून नवीन विमानसेवा नाहीच; मागणी असून देखील स्लॉट वाढवून न मिळाल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा
पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हिवाळी हंगाम सुरू झाला आहे; परंतु या हंगामात नवीन एकाही शहराला विमान उड्डाणे जोडले गेले नाही. नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमान उड्डाणांची संख्या वाढवून मिळण्याची मागणी असून देखील स्लॉट वाढवून मिळाले नाहीत. त्यामुळे विमान प्रवाशांची निराशा झाली आहे.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुणे आणि उन्हाळी हंगाम २५ ऑक्टोबरला संपला. त्यानंतर दि. २६ पासून हिवाळी हंगाम सुरू झाला आहे. हवाई दलाकडून उन्हाळी हंगामासाठी पुणे विमानतळाला जवळपास २२० स्लॉट देण्यात आले होते. परंतु यातील २०८ स्लॉटचा वापर उन्हाळी हंगामात करण्यात आला. तर, १२ स्लॉट रिकामे होते. या काळात पुणे विमानतळावरून साधारण ३० ते ३२ हजार प्रवासी दररोज प्रवास करत होते. पुणे हे लष्कराचे विमानतळ असल्यामुळे सकाळी नऊ ते साडेअकरादरम्यान ते बंद असते. त्यामुळे दिवसा स्लॉटची संख्या कमी असते. तर रात्री प्रवासी वाहतुकीसाठी स्लॉट जास्त असतात. त्यामुळे पुण्यातून सुटणारी आणि येणाऱ्या विमानांची संख्या रात्री जास्त असते; पण नवीन १५ स्लॉट हे दिवसाचे होते. त्यामुळे त्या स्लॉटचा वापर करून वेगवेगळ्या शहरांसोबत हवाई वाहतूक जोडण्यासाठी त्याचा वापर होणे अपेक्षित होते. हिवाळी हंगामात नवीन शहरे आणि मागणी असलेल्या ठिकाणी विमान सेवा वाढविण्यासाठी त्याचा वापर होणे अपेक्षित होते. पण हिवाळी हंगाम सुरू झाला असला तरी पुण्यातून या हंगामात नवीन शहरांसाठी विमान सेवा वाढल्याचे दिसून आलेले नाही. याबाबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
केवळ ३५ शहारांसोबत थेट कनेक्टिव्हिटी...
पुणे विमानतळाचा हिवाळी हंगाम २६ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून, उन्हाळी हंगामात पुण्यातून ३५ शहरांसाठी विमान सेवा सुरू होते. त्यामध्ये दिल्लीसाठी सर्वाधिक विमान सेवा आहे. तर, दुबई, बँकॉक, पुण्यातून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू आहेत. नव्याने सध्या तरी एकही आंतरराष्ट्रीय सेवा वाढलेली नाही. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विमानांचे स्लॉट वाढवून देण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न करून हवाई दलाकडून १५ स्लॉट वाढवून घेतले. परंतु त्याचा वापर करण्यात आले नाही.
पुणे विमानतळाच्या हिवाळी वेळापत्रकात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढून अनेक नवीन शहर देखील विमानसेवेने जोडली जातील, ही पुणेकरांची मोठी आशा होती. सिंगापूर, अबुधाबीसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांबरोबरच मुंबई, नाशिक, बेळगाव, सोलापूर व भारतात अनेक ठिकाणी अलीकडेच सुरू झालेल्या विमानतळांवरून पुणे हवाई सेवेने जोडण्यासाठी मोठी मागणी आहे. यामुळे नवीन शहरांना जोडण्यासाठी तसेच मागणी असलेल्या शहरांना अधिक उड्डाण सुरू करण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत.- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ
अशी आकडेवारी
मिळालेली स्लॉट : २२०
वापरण्यात आलेले स्लाॅट : २०८
शिल्लक स्लाॅट : १२
दैनंदिन प्रवासी संख्या : ३० ते ३२ हजार