नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:24 IST2025-06-18T13:24:01+5:302025-06-18T13:24:43+5:30

काँग्रेसच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीत दलालांचा सुळसुळाट होता; पण संरक्षण खरेदीतील ‘दलाल’ बाहेर काढून मोदी सरकार थेट संबंधित देशांशीच करार करत आहे

No minister in Narendra Modi government has been accused of corruption Prakash Javadekar | नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर

पुणे : ‘केंद्र सरकारने संरक्षण उत्पादनांच्या देशाअंतर्गत उत्पादनाला चालना दिली. त्यामुळे भारत आता शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा देश बनला आहे. ऑपरेशन सिंदूरमधून भारताच्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. काँग्रेसच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीत दलालांचा सुळसुळाट होता; पण संरक्षण खरेदीतील ‘दलाल’ बाहेर काढून सरकार थेट संबंधित देशांशीच करार करत आहेत, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या काळात विरोधी पक्ष केंद्र सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकले नाहीत, एकाही मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला नाही,’ असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, अमोल कविटकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात १९८४ नंतर पहिल्यांदाच देशाला दीर्घकाळ स्थिर सरकार मिळाले. मोदी सरकारच्या काळात सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या गेल्या. असे सांगून प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण अंगीकारत अंत्योदयासाठी काम केले. गरिबांना घर, पाणी, वीज, शौचालय, गॅस, आयुष्यमान कार्ड आदी सुविधा दिल्या. त्यामुळे ३० कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. काँग्रेसच्या १० वर्षांच्या काळात ८ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले होते; पण मोदींनी तब्बल ३० लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. जनधन बँक योजनेमुळे प्रत्येकाला खाते मिळालेच; पण बँकांचा नफाही सहा पटीने वाढला आहे. उद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य यासह अनेक क्षेत्रांत देशाची मोठी प्रगती गेल्या ११ वर्षांत झाली आहे. काँग्रेसच्या काळात देशात बॉम्बस्फोट होत होते; पण आता या घटना बंद झाल्या आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.

Web Title: No minister in Narendra Modi government has been accused of corruption Prakash Javadekar