पुणे : चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्यात गुन्हेगारी टोळीचा हात नसल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. हल्ला प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले.
योगेश कदम यांनी शुक्रवारी (दि. १७) पुणेपोलिस आयुक्तालयाला भेट दिली. कदम यांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. बैठकीनंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईतील वांद्रे भागात सैफ अली खान याच्या निवासस्थानात शिरून हल्ला करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. यापूर्वी वांद्रे भागात अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानावर गोळीबार करण्यात आला. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमागे लाॅरेन्स बिष्णोई टाेळीचा हात आहे. खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे गुन्हेगारी टोळीचा हात आहे का? विरोधकांच्या या प्रश्नावर बोट ठेवून माध्यमांनी सवाल उपस्थित केला होता.
यावर उत्तर देताना कदम यांनी, सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे गुन्हेगारी टोळीचा हात नाही. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील छबीत एक संशयित आढळून आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणात आणखी काहीजण सहभागी असल्याचा संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे, असे सांगितले. सैफच्या अपार्टमेंटच्या परिसरात सुरक्षारक्षक नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळून आल्या आहेत. याप्रकरणाचा तपास सुरू असून, संशयितांच्या मागावर पोलिस आहेत, असे त्यांनी नमूद केले.
अमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाईचे आदेश..
शहरात मेफेड्रोनसह वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत दिले. शहरात वाहतुक नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे. बेशिस्त वाहनचालक, तसेच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाईचे आदेश देखील कदम यांनी दिले. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढवावी, तसेच गुटखा, अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहेत. एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसल्यास गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, अशा सूचना यावेळी दिल्या. तसेच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या, सिग्नलची व्यवस्था याबाबत देखील त्यांनी सूचना दिल्या.