'गद्दारांना माफी नाही', पुण्यात बंडखोर आमदारांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 13:06 IST2022-06-26T13:05:34+5:302022-06-26T13:06:17+5:30
उद्धव साहेब आम्हास आपला सार्थ अभिमान आहे

'गद्दारांना माफी नाही', पुण्यात बंडखोर आमदारांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन
कोथरूड : शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, ज्याला भगवा कळेल त्याचेच संकट टळेल, गद्दारांना माफी नाही, उद्धव साहेब आम्हास आपला सार्थ अभिमान आहे. अशी जोरदार घोषणाबाजी करत पुण्यातील कोथरूड येथे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदारांच्या फोटोला जोडे मारत कोथरूड येथील कर्वे पुतळा चौकात रस्त्यावर उतरत बंडखोर आमदारांचा निषेध करत आंदोलन केले.
आम्ही उध्दव ठाकरे बरोबरच असल्याचे आंदोलकांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी असंख्य आमदारांना घेऊन शिवसेनेसोबत बंड केल्याने शिवसैनिकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. निम्म्यापेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार हे मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. याच्या विरोधात आज कोथरुड येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलनात कोथरुड भागातील माजी नगरसेवक, गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर प्रमुख गजानन थरकुडे, शाखा प्रमुख संतोष दिघे, नितीन शिंदे, उपविभाग प्रमुख पुरोषत्तम विटेकर आदी उपस्थित होते.