Pune News | नीरा - निंबुतच्या हद्दीतील ज्युबिलंट कंपनीत आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 11:31 IST2022-06-04T11:27:06+5:302022-06-04T11:31:16+5:30
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Pune News | नीरा - निंबुतच्या हद्दीतील ज्युबिलंट कंपनीत आग
नीरा : काल रात्री नीरा - निंबुतच्या हद्दीतील ज्युबिलंट कंपनीत शुक्रवारी रात्री उशीरा आग लागली होती. लोकवस्ती शेजारील कंपनीच्या कंपाऊंडच्या आत लोखंडी जिन्यावर सुमारे अर्धा तास ही आग लागल्याची लोकांना दिसून आले. त्यामुळे लोक भयभीत झाले होते, तर काहींनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले.
नीरा (ता.पुरंदर) येथील वार्ड क्र. ६ शेजारी विविध घातक रसायनांची निर्माती असलेल्या ज्युबिलंट इनिग्रेव्हा या कंपनीत कायमच अशा अपघातांच्या घटना घडत असल्याची चर्चा आहे. नीरा वार्ड क्र. ६ मधील रहिवाशांना असे अपघात आता नित्याचे झाले आहेत. लोकवस्तीत आधी असे अपघात घडल्याचे समजते. कंपनीच्या एक टोकाला अपघात झाल्यास स्थनिक लोक कंपनीच्या अधिकाऱ्यांना अशा अपघातांची कल्पना देतात, असे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
शुक्रवार दि. ३ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास कंपनीच्या एका प्लँँटवर जाणाऱ्या लोखंडी जिन्यावर सुमारे अर्धा तास ही आग स्थनिकांना दिसल्याचे त्यांनी सांगितले. असे अनेकवेळा झाले, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.