आळंदीत १९ वर्षाच्या युवतीवर बलात्कार; शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 23:27 IST2025-07-12T23:27:33+5:302025-07-12T23:27:33+5:30
आळंदीत एका तरुणीने जबरदस्तीने अपहरण करुन बलात्कार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.

आळंदीत १९ वर्षाच्या युवतीवर बलात्कार; शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भानुदास पऱ्हाड
Pune Crime : आळंदीत १९ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित युवतीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून बलात्कार केल्याची गंभीर तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीनुसार, २ जून २०२५ रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना, तिच्या ओळखीच्या जनाबाई आंधळे या तिला शेतात चल असे म्हणत बाहेर घेऊन गेल्या. वाटेत एका काळ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून (एमएच ४३ सीसी ७८१२) आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एक अनोळखी चालकाने जबरदस्तीने तिला गाडीत बसवले. त्या वेळी आरडा-ओरडा केल्यावर अॅसिड टाकण्याची धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर तिला तीर्थक्षेत्र आळंदी येथे नेण्यात आले.
आळंदीत आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, किर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार, आण्णासाहेब आंधळे याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने एका मोबाईल फोनद्वारे ११२ वर संपर्क साधून मदत मागितली. आळंदी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुरुवातीला घाबरल्यामुळे पीडित युवतीने तक्रार दिली नव्हती, परंतु घरच्यांना सर्व हकीकत सांगितल्यावर ७ जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.