Nilesh Ghaiwal: निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांचे UK हाय कमिशनला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:09 IST2025-10-28T15:09:01+5:302025-10-28T15:09:33+5:30
पोलिसांच्या माहितीनुसार, घायवळ लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्वासन त्यांना मिळाले आहे

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांचे UK हाय कमिशनला पत्र
पुणे: पुणे पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या परदेशात असल्याची माहिती आहे. पूर्वीच निलेश घायवळविरुद्ध रेड कॉर्नर आणि ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असून, आता ट्रॅकिंग प्रक्रिया सुरू आहे. अशातच निलेश घायवळबाबत नवी माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांनी युके हाय कमिशनला पत्र लिहिले आहे. निलेश घायवळला परत भारतात पाठवावे, असे पत्रात पोलिसांनी नमूद केले आहे. युके हाय कमिशनकडून निलेश घायवळचा ट्रॅकिंग सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घायवळ लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्वासन त्यांना मिळाले आहे.
गुंड निलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांकडून आतापर्यंत वेगवेगळ्या गंभीर प्रकाराचे दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून निलेशची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न सुरू आहेत. मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गुंड निलेश घायवळ सध्या परदेशात आहे. त्याने घायवळ ऐवजी गायवळ नावाचा वापर करत पासपोर्ट मिळवण्याचे यापूर्वीच पोलिस तपासात समोर आले आहे. त्याने ‘ घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे.
घायवळ याचे कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात घर आहे. त्याचे घर आणि कार्यालयाची झडती कोथरूड पोलिसांनी नुकतीच घेतली होती. घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. पोलिसांनी घायवळ याच्या घरातून धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सचिन याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.