कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
By किरण शिंदे | Updated: September 25, 2025 22:22 IST2025-09-25T22:19:14+5:302025-09-25T22:22:49+5:30
कोथरुडमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात टोळीचा सूत्रधार निलेश घायवळ यालाही आरोपी करण्यात आले.

कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
Pune Crime: कोथरूड भागात दहशत पसरवणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीवर पुणेपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्री झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात टोळीचा सूत्रधार निलेश घायवळ यालाही आरोपी करण्यात आले आहे.
कोथरूडमध्ये गोळीबार आणि कोयत्याचे वार
किरकोळ वादातून घायवळ टोळीच्या सहा सदस्यांनी प्रकाश धुमाळ या तरुणावर गोळीबार केला. तर काही अंतरावरच वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. या दोन घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोथरूड पोलिसांनी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले होते.
संघटित गुन्ह्यांचा इतिहास
घायवळ टोळीवर यापूर्वीही खूनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, मारामाऱ्या अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदलेले आहेत. प्राथमिक तपासात हे हल्ले टोळी युद्धाचा भाग असल्याचे आणि संघटित स्वरूपात कारवाया केल्या गेल्याचे स्पष्ट झाले.
आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई
पोलिसांनी सखोल तपास करून निलेश घायवळसह मयूर कुंभरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चादळेकर, मुसाब शेख, अक्षय गोगावले आणि जयेश वाघ यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दहशत वाढवण्यासाठी चिथावणी
“संबंधित आरोपींना पिस्तुल निलेश घायवळकडून देण्यात आले होते. आपली दहशत कमी होत चालली आहे, पैसा मिळत नाही, त्यामुळे धाक निर्माण करा,” अशी चिथावणी त्याने दिल्याचे तपासात उघड झाले आहे, त्यानंतर संघटित गुन्हेगारी आणि नागरिकांवर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोका कारवाई केली गेली असून, पुढील तपास पुणे गुन्हे शाखा करत आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशीलवार शोध घेण्यात येत आहे.