फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणारा नायजेरियन जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 20:38 IST2018-07-28T20:32:23+5:302018-07-28T20:38:00+5:30
फेसबुकवर मैत्री करून गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली आहे़.

फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणारा नायजेरियन जाळ्यात
पुणे : फेसबुकवर मैत्री करून गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली आहे़. अत्से सर्ज (वय ३०, रा़ दिल्ली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १७ मोबाईल हँडसेट्स, सिमकार्ड, ६ डेबिट कार्ड, ४ पासबुक, १ चेकबुक जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्याद देणारी व्यक्ती एका हॉटेलमध्ये नोकरी करतात. मागील दीड वर्षांपासून त्यांची फेसबुकवर त्या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याच्याशी चॅटिंंग सुरु झाली. मे २०१८ मध्ये त्यांना त्या व्यक्तीने व्हाटस अपवर पार्सलचे फोटो पाठवले़. त्यानंतर एक आठवड्यानंतर दिल्ली एअरपोर्ट आॅफिसमधून प्रिया शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने फोन करून पार्सलमध्ये परदेशी चलन आहे, असे सांगितले. ते मिळविण्यासाठी त्यांना १ लाख १७ हजार रुपये खात्यात भरण्यास भाग पाडत फसवणूक केली. या प्रकरणाचा समांतर तपास सायबर गुन्हे शाखेकडून सुरु होता. त्यावेळी मोबाईल कंपनी आणि बँकेशी पत्रव्यवहार करून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तांत्रिक अभ्यास करत फसवणूक करणारा दिल्लीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अत्से सर्ज याला दिल्लीतील उत्तमनगर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे, पोलिस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण औटी, नीतीन खामगळ, कर्मचारी शिरीष गावडे, अतुल लोखंडे व इतर कर्मचारी यांच्या पथकाने केली.