बंगळुरूतील कॅफे बाॅम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी पुण्यात आल्याचा NIA ला संशय; तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 12:06 PM2024-03-09T12:06:50+5:302024-03-09T12:07:43+5:30

बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर संशयित दहशतवादी बसने कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला. त्यानंतर भटकल, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे...

NIA suspects that terrorists in the cafe bombing case in Bangalore have come to Pune; Investigation begins | बंगळुरूतील कॅफे बाॅम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी पुण्यात आल्याचा NIA ला संशय; तपास सुरू

बंगळुरूतील कॅफे बाॅम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी पुण्यात आल्याचा NIA ला संशय; तपास सुरू

पुणे : बंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत झालेल्या बाॅम्बस्फोट प्रकरणातील संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला आहे. बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर संशयित दहशतवादी बसने कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला. त्यानंतर भटकल, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, संशयित दहशतवादी नक्की पुण्यात पोहोचला किंवा वाटेत त्याने बस बदलली का, याबाबत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही.

एक मार्च रोजी बंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत बाॅम्बस्फोट घडविण्यात आला. स्फोटकांनी भरलेली पिशवी ठेवून संशयित दहशतवादी तेथून पसार झाला. स्फोटानंतर तपास यंत्रणांनी रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. चित्रीकरणात संशयित दहशतवादी आढळून आला. चित्रीकरणाद्वारे संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर संशयित बंगळुरूतून बसने पसार झाला. बल्लारी स्थानकात तो बसमधून उतरल्याची माहिती एनआयएच्या पथकाला मिळाली. तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे.

बल्लारी स्थानकातून बस बदलून तो कर्नाटकातील हाेस्पेट, गोकर्णपर्यंत गेल्याचे आढळून आले आहे. तेथून तो बसने पुण्याकडे आल्याचा संशय एनआयएच्या पथकाला आहे. कर्नाटकातील तपास यंत्रणांनी याबाबतची माहिती एनआयएच्या पुणे-मुंबईतील पथकांना दिली आहे. मात्र, संशयित दहशतवाद्याचा वावर नेमका कोठे आहे, हे निश्चित सांगता येत नाही. संशयित दहशतवादी नेमका कसा पसारा झाला. यादृष्टीने तपास सुरू आहे. बंगळुरूतील बसस्थानक, बल्लारी बसस्थानक, हाेस्पेट, भटकल, गोकर्ण या बसस्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: NIA suspects that terrorists in the cafe bombing case in Bangalore have come to Pune; Investigation begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.