‘झुलवा’कारांच्या घराला चढला नवीन साज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 07:00 IST2019-06-11T07:00:00+5:302019-06-11T07:00:10+5:30
सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या या लेखकावर लक्ष्मी मात्र कायमच रुसलेली राहिली. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे जगणेही अवघड झाले होते.

‘झुलवा’कारांच्या घराला चढला नवीन साज
पुणे : ‘झुलवा’कार अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांच्या राहत्या घराला नवीन साज चढला असून त्यांचे हलाखीचे जगणे काही प्रमाणात का होईना सुसह्य करण्याचा प्रयत्न घर बांधून करण्यात आला आहे. पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी तुपे यांचे घर बांधून दिले आहे.
साहित्य अकादमी आणि असे अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले तुपे पुण्यात हलाखीचं जीवन जगत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. वास्तविक तुपे यांची राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यपदी निवडही झालेली आहे. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या या लेखकावर लक्ष्मी मात्र कायमच रुसलेली राहिली. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे जगणेही अवघड झाले होते. त्यातच पत्नीसह त्यांनाही पक्षाघात झाल्याने आरोग्याचेही प्रश्न निर्माण झाले होते. याबाबत समाज माध्यमांमध्ये बातम्या झळकल्यावर समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह भेट घेत मदतीचे आश्वासन दिले होते. काही विशिष्ट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासोबतच त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही दिले होते.
तुपे हे मुळचे सातारा जिल्ह्यामधील असून ते कुटुंबासह खडकी येथील मुळा रोड वसाहतीमध्ये राहण्यास आहेत. त्यांना दोन मुले असून एक मुलगा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. डॉ. धेंडे यांनी तुपे यांचे घर बांधून देण्याचे ठरविले होते. त्या आश्वासनाची पूर्ती करत स्वत:च्या खर्चामधून दोन मजली घर बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पूर्वी दहा बाय दहाची पत्र्याची असलेली आता दुमजली झाली आहे.
====
उपेक्षितांच्या साहित्यिकांच्या नशिबी अजूनही उपेक्षितांचेच जगणे आहे. दीनदलितांसह समाजाच्या वास्तवावर भाष्य करणारे, आपल्या प्रतिभा लेखणीद्वारे उमटवणारे उत्तम बंडू तुपेंसारखे साहित्यिक हलाखीच्या परिस्थितीत जगतात हा खरेतर समाजाचाही पराजय आहे. ते हलाखीच्या परिस्थितीत जगत असल्याचे समजल्यानंतर मी माझ्यापरिने जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये फार मोठे काम मी केलेले नाही. जे माझे कर्तव्य होते, तेच केले आहे.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर, पुणे
====
तुपे यांना गेल्याच आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
...........