पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारी, लूटमार, दहशत, गाड्यांची तोडफोड अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुण्यात दिवसांपूर्वी कोयता गँगच्या दहशतीने लोकांमध्ये भीती पसरली होती. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गे व्यक्तींना डीएसके रोड ते रायकर मळा परिसरात अज्ञात स्थळी बोलावून लुटमार आणि मारहाण करण्याची घटना घडली आहे. याबाबत नांदेड सिटी पोलिसांनी कारवाई केली असून या गँगमधील तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गे डेटिंग अॅपचा गैरवापर करून लोकांना ही गॅंग फसवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डीएसके रोड ते रायकर मळा परिसरातील अज्ञात स्थळी ते गे व्यक्तीला भेटायला बोलावतात. त्यांनतर त्याला मारहाण करत पैसे, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटतात. या गँगने 'गे' लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींनी एका अॅपचा वापर करून गे व्यक्तींशी ओळख केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी या व्यक्तींना अज्ञात स्थळी भेटण्यासाठी बोलावलं. गे व्यक्ती भेटायला आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडून जबरदस्तीने वस्तू हिसकावल्या. बदनामीच्या भीतीमुळे बळी पडलेले लोक तक्रार करत नव्हते. याचा गैरफायदा आरोपी घेत होते. या गँगमधील ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सोशल मीडियावर असा मेसेज होतोय व्हायरल
धोक्याची सूचना:
पुण्यात DSK रोड ते रायकर मळा येथे काही तरुण मुले (वय १५ - १७ वर्षे असेल) रहदारीच्या गाड्या थांबवतात आणि "माझ्या घरी मेडिकल इमरजंसी आहे", असे सागून गाडीत बसतात. गाड़ी घरी घ्या सागून शांत ठिकाणी नेऊन मारहाण करतात, पैसे - पर्स - मोबाइल- पाकीट - ऐवज; जे असेल ते घेतात. मागील आठवड्यात पासून ३ घटना झाल्या आहेत. सतर्क रहावे.