पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात खासगी ठेकेदाराच्या आलेल्या नवीन बंद पडत आहेत. शिवाय एप्रिल अखेरपर्यंत ठेकेदारांच्या ४०० बस ताफ्यात दाखल होणार होते. परंतु नव्या बस बंद पडू लागल्याने नवीन नव्या बस दाखल करण्यासाठी थांबविण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात प्रवास करताना कसरत करण्याची वेळ आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी पीएमपीच्या ताफ्यात ठेकेदारांच्या बस दाखल होण्यास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने हे बस दाखल होत आहेत. परंतु नव्या बस बंद पडत असल्यामुळे एप्रिल २०२५ अखेरपर्यंत सर्व ४०० बस ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. परंतु आता याला खीळ बसणार आहे. चार ठेकेदारामार्फत नव्याने या बस येत आहेत. त्यापैकी तीन ठेकेदारांकडून आलेल्या नवीन बस बंद पडण्याचे प्रकार घडू लागले. तसेच, चढावर इंजिन गरम झाल्याने बस चढत नव्हती. जास्त इंजिन गरम झाल्यामुळे बस रस्त्यातदेखील बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे पीएमपीने संबंधित ठेकेदारांना बस तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बस बंद पडू लागल्यामुळे पीएमपी व ठेकेदारांनी नवीन बस मार्गावर आणणे बंद केले आहे. बस बंद का? पडतात यावर जोपर्यंत मार्ग निघत नाही, तोपर्यंत पीएमपीने नवीन बस ताफ्यात घेणे थांबवले आहे, अशी माहिती पीएमपीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दीड वर्षानंतर बस दाखल
ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत १०० स्वमालकीच्या आणि ४०० भाडेतत्त्वावरील सीएनजी बस घेण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर स्वमालकीच्या बसची संख्या वाढविण्यात आली. फेब्रुवारी २०२४ पासून या बस खरेदीची निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. पण, नंतर लोकसभा व विधानसभा निवडणूक आल्यामुळे निविदा प्रक्रिया लांबली. त्यानंतर नवीन अध्यक्ष आल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आले.