ना बापट, ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपची जबाबदारी; पुण्यात आता देवेंद्र फडणवीसच 'कारभारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:01 PM2021-07-24T17:01:58+5:302021-07-24T19:01:19+5:30

जमिनीवरील कार्यकर्त्यांत मात्र कोणत्या नेत्यामागे जावे, हाच संभ्रम

Neither Bapat, nor Chandrakant Patil, Devendra Fadnavis lead in the Pune | ना बापट, ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपची जबाबदारी; पुण्यात आता देवेंद्र फडणवीसच 'कारभारी'

ना बापट, ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपची जबाबदारी; पुण्यात आता देवेंद्र फडणवीसच 'कारभारी'

Next

अविनाश थोरात - 

पुणे : वर्षभरावर आलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा पुण्यात चालणार असल्याचा निष्कर्ष भारतीय जनता पक्षाच्या एका सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. त्यामुळे वाढदिवसाचे निमित्त साधून पुण्यात फडणवीस यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.  मात्र, भाजपामध्ये कार्यकर्त्यांत संभ्रम असून खासदार गिरीष बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील की आता देवेंद्र फडणवीस यांच्यामागे जायचे असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्याच दिवशी अजित पवार यांचा वाढदिवस असल्याने पुण्यातील फडणवीस-पवार होर्डींग वॉरची चर्चा चांगलीच रंगली आहे.

नव्या पुण्याचे शिल्पकार, विकासपुरुष या विशेषणांनी पुण्यात फडणवीस यांची अनेक होर्डींग्ज लागली आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना टक्कर देण्यासाठी हे होर्डींग वॉर भाजपने सुरू केल्याची चर्चा आहे. विकासपुरुष विरुध्द कारभारी अशी लढाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकांत पराभव झाला तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत अजित पवार यांची ताकद आहे. आता राज्यात सत्ता असल्याने ही ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे अजित पवारांविरुध्द लढण्यासाठी पुण्यात फडणवीस यांचा चेहरा उपयुक्त ठरेल, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. नाशिक महापालिका निवडणुकांच्या वेळी फडणवीस यांनी आपण नाशिकचे पालकत्व स्वीकारले आहे. या शहराचा चेहरा-मोहरा मी बदलून टाकेन असे आश्वासन दिले होते. त्यावेळी नाशिकमध्ये भाजपची सत्ता आली होती. हाच प्रयोग पुण्यातही भाजप करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे फडणवीस यांचा सर्वात जंगी वाढदिवस पुण्यातच साजरा करण्यात आला.


------------
कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता
* देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व पुण्यात प्रस्थापित केले जात असल्याचे पाहून भाजपच्या काही गटांत अस्वस्थताही आहे. पूर्वी राज्यातील मुंडे-गडकरी गटाच्या वादात पुण्यातील कार्यकर्ते भरडले गेले होते.
* मुंडे गटाचे समजले जाणारे माजी खासदार अनिल शिरोळे यांना
नगरसेवकपदाची उमेदवारी नाकारण्यात आली होती.

* यावेळी आताचे महापौर असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी येथील भाजप कार्यालयावर हल्ला करून तोडफोडही केली होती.
-------------
गणेश बीडकर यांना स्वीकृत नगरसेवकपद देऊन श्रीगणेशा
महापालिकेतील सभागृहनेते गणेश बीडकर यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळाल्यापासूनच देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेत लक्ष घालायला सुरूवात केल्याचे संकेत मिळाले होते.
-------------
नव्या पुण्याचे शिल्पकार फडणवीस कसे? राष्ट्रवादीचा सवाल
नव्या पुण्याचे शिल्पकार फडणवीस कसे असा सवाल राष्ट्रवाद कॉँग्रेसने केला आहे. पुणे हे नवं कधीच नव्हते. पुण्याला मोठा इतिहास आहे. शरद पवार, अजित पवार यांचे पुण्याच्या विकासात योगदान आहे. गेल्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली. त्यांनी पुण्याचा काय विकास केला याची नोंद पुणेकरांनी ठेवली आहे. फक्त रंगसफेदी करून स्मार्ट सिटी होत नसते, अशी टीका राष्ट्रवाद कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. मेट्रो आणण्याचे श्रेयही फडणवीस यांना देऊ नये. कारण मेट्रोचा प्रस्ताव पुणे महापालिकेत राष्ट्रवादची सत्ता असताना मंजूर केला होता आणि राज्य सरकारकडून निधी देण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केले होते, असे त्यांनी म्हटले आहे.
------------
चंद्रकांत पाटील कोथरुडपुरतेच मर्यादित राहणार का?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोथरुड मतदारसंघातून निवडून आल्यावर साहजिकच पुण्याचे नेतृत्व त्यांच्याकडे जाणार असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात आणून पाटील यांना कोथरुड मतदारसंघापुरतेच मर्यादित ठेवणार का? अशी चर्चाही सुरू झाली आहे.

बापट यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची नुसतीच घोषणा
पुण्याची निवडणूक बापट यांच्या नेतृत्वाखाली अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. प्रत्यक्षात बापट यांनी बोलविलेल्या बैठकांना पालिकेतील पदाधिकारी फार गंभीरपणे घेत नाही, असा आरोप होत आहे. पुण्यातील महत्वाच्या निविदांसाठीही पुण्यातील पदाधिकारी हे फडणवीस यांचा कौल घेतात. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आणि पुण्यातील आमदार असले तरी पुण्यासाठीचे अनेक निर्णय फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावरूनच होत असल्याने सध्या तरी तेच खरे कारभारी ठरले आहेत.

Web Title: Neither Bapat, nor Chandrakant Patil, Devendra Fadnavis lead in the Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.