राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:58 IST2020-12-25T23:21:12+5:302020-12-26T06:58:49+5:30
Rupali Chakankar : याबाबत रूपाली चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप राजेंद्र कठाळे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी
धायरी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याचा धमकीचा फोन आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे तालुका वाळवा जिल्हा सांगली) याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील धायरी भागात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका इसमाचा फोन आला असता चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी तो उचलला. त्यावेळी फोनवरून मी जयंत रामचंद्र पाटील बोलत असून मला रूपाली चाकणकर यांचा मोबाईल नंबर दे, ती काय करते ते बघतोच तसेच तुला माहिती नाही का मी कोण आहे ते, तुला तुमचे कार्यकर्ते किंवा पोलिस बोलवायचे असतील तर बोलव, मी घाबरत नाही असे म्हणत तुमचे कार्यालय पेटवून देईन अशी धमकी इसमाने फोनवरून दिली.
याबाबत चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप राजेंद्र कठाळे (वय:२५, रा. विठाई सोसायटी, धायरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ज्या कुणी अनोळखी व्यक्तीने फोन करून अशा पद्धतीने भाषा वापरून धमकीचा फोन केला आहे. त्याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य तो तपास करतील, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे.
- रूपाली चाकणकर
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा