बदनामी करणाऱ्या फेसबुक अकाउंट विरोधात राष्ट्रवादीची पोलिसांत धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 17:55 IST2019-08-19T17:53:29+5:302019-08-19T17:55:38+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाच्या विविध नेत्यांची आक्षेपार्ह्य शब्दात बदनामी करणाऱ्या आघाडीबिघाडी या फेसबुक अकाउंटवर कारवाई व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह खासदार वंदना चव्हाण व अन्य नेत्यांनी थेट सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे.

बदनामी करणाऱ्या फेसबुक अकाउंट विरोधात राष्ट्रवादीची पोलिसांत धाव
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाच्या विविध नेत्यांची आक्षेपार्ह्य शब्दात बदनामी करणाऱ्या आघाडीबिघाडी या फेसबुक अकाउंटवर कारवाई व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह खासदार वंदना चव्हाण व अन्य नेत्यांनी थेट सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. पुण्यात सायबर क्राईम विभागात या पेजविषयी तक्रार अर्ज देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्ष आपापला अजेंडा ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू त्याला उत्तर म्हणून विरोधकांकडून टीकाही केली जाते. त्यात लिखित पोस्ट, मिम्सचा समावेश असतो. आगामी निवडणुका बघता सोशल मीडियावरही शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. मात्र त्यातही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना टार्गेट केले जाते. विशेषतः त्यांच्या एखाद्या वक्तव्याला केंद्रस्थानी ठेवून टीका केली जाते. मात्र ही टीका पातळी सोडून आणि वैयक्तिक बदनामी करणारी असेल तर संबंधित व्यक्तीला किंवा पक्षाला थेट पोलिसात तक्रार करण्याची मुभा आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित फेसबुक पेजवर बंदी घालून ते चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत असा अर्ज केला आहे.
याबाबत लोकमतशी बोलताना चाकणकर म्हणाल्या की,' राजकारणातही टीका करताना पातळी ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही नेत्यामागे हजारो कार्यकर्ते असतात. त्यामुळे शत्रूवरसुद्धा संयमित आणि तरीही धारदारपणे टीका करता येते, आम्हीही ती करतो. मात्र या पानावर ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीय टार्गेट केले जात आहे ते अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे आता संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे'. हा अर्ज देताना चाकणकर आणि चव्हाण यांच्यासह पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि इतर कार्यकर्ते हजर होते.