Video: "अहो बापट, काय हे नाटक? सत्तेचे अपयश लपवण्यासाठी कसली ही आदळआपट", पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 14:06 IST2022-03-31T14:04:33+5:302022-03-31T14:06:53+5:30
पुण्याच्या पाणीप्रश्नी गेली ५ वर्ष पुणे महानगरपालिकेत सत्ता उपभोगलेल्या पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन

Video: "अहो बापट, काय हे नाटक? सत्तेचे अपयश लपवण्यासाठी कसली ही आदळआपट", पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे : पुण्याच्या पाणीप्रश्नी गेली ५ वर्ष पुणे महानगरपालिकेत सत्ता उपभोगलेल्या भाजपचे नेते व पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी "अहो बापट, काय हे नाटक? सत्तेचे अपयश लपवण्यासाठी कसली ही आदळआपट" , "पाणी देणार होते 24 तास, मात्र पाणी मिळेना आम्हाला धड दोन तास", "24×7 योजनेचे काय झाले..?" , "गिरीश बापट जवाब दो", "खासदार साहेब झाली का झोप...?" या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
''पुणे शहरात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षात शहरातील पाणीपुरवठ्याचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करता आले नाही. संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येणे, दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद असणे, पाणी न येणे असे प्रकार वारंवार घडत असून हे महापालिकेतील गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी भाजपचे अपयश आहे. पुणेकरांच्या या मनस्तापाला केवळ भाजप जबाबदार आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी 24×7 पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगत भाजप सत्तेत आली. आज प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की २४ तास तर सोडा हक्काचे १ तास सुध्दा पाणी मिळत नसल्याचे यावेळी राष्टवादीच्या वतीने सांगण्यात आले.''
पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन #Pune#BJP@JagtapSpeakspic.twitter.com/SJJnQlZM29
— Lokmat (@lokmat) March 31, 2022
टॅक्सचे संपूर्ण पैसे घेऊन देखील ३६५ दिवस महानगरपालिका पाणीपुरवठा नाही
''मुळात समान पाणी वाटप योजनेचे काम तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु पाच वर्ष होऊन देखील भाजपलाही काम पूर्ण करता आले नाही. या कामाची झळ आज समस्त पुणेकरांना बसत आहे. पाणीपुरवठ्याचे टॅक्सचे संपूर्ण पैसे घेऊन देखील ३६५ दिवस महानगरपालिका पाणीपुरवठा करत नसेल, तर गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामावर ती प्रश्नचिन्ह उपस्थित जात आहे. हा सर्व गलथान कारभार सुरू असताना पुणे शहराचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. आता प्रशासक आल्यानंतर मात्र झोपेतून जागे झालेल्या कुंभकर्ण प्रमाणे ते जागे झाले असून त्यांना अचानकपणे पुणेकरांच्या प्रश्नांची जाण जाणीव होऊ लागली आहे. पुणेकर जनता सुज्ञ असून भाजप कडून सुरू असलेली ही दिशाभूल जनतेने वेळीच ओळखावी. प्रत्येक प्रभागात हिच परिस्थिती असून केवळ लाटेवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या कामांवर संकल्पना म्हणून बोर्ड लावण्याचे काम केले आहे याव्यतिरिक्त भाजप नगरसेवकांचे कुठल्याही प्रकारचे कर्तुत्व नाही " असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.''