'बस्स झालं ऑनलाईन शिक्षण आता ऑफलाईनची सवय लावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 05:29 PM2021-10-22T17:29:58+5:302021-10-22T17:54:42+5:30

यावेळी बोलताना सामंत म्हणाले, कोरोना महामारीच्या प्रारंभी या विषाणूचे स्वरुप माहिती नसल्याने विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची सुरक्षितता लक्षात घेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता

national education policy 2020 uday samant nep implementation in maharashtra | 'बस्स झालं ऑनलाईन शिक्षण आता ऑफलाईनची सवय लावा'

'बस्स झालं ऑनलाईन शिक्षण आता ऑफलाईनची सवय लावा'

googlenewsNext

पुणे: कोरोनामुळे महाविद्यालयीन शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्याव्या लागल्या. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईनच हवेहवेसे वाटू लागले आहे. परंतु, कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश आल्यामुळे आता महाविद्यालये ऑफलाईन पध्दतीने सुरू झाली आहेत. त्यामुळे या पुढील काळात विद्यार्थ्यांनी ऑफलाईन शिक्षण व परीक्षांची सवय करून घ्यावी, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पुण्यात केले.

NEP 2020 वर काय म्हणाले सामंत?

राज्यातील विद्यार्थी देशातच नव्हे तर जगात दर्जेदार शिक्षणाने समृद्ध व्हावा यासाठी राज्यात उत्कृष्ट पद्धतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP 2020) अंमलबजावणी केली जाईल. एनईपीमध्ये अजून काही चांगल्या बाबी सुचवण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने राज्य शासनाला शिफारसींचा अहवाल दिला आहे. त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यकतेप्रमाणे केंद्र शासनाला शिफारसी करण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आज सांगितले.

कोरोना परीस्थितीच्या टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामंत यांनी राज्यातील महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत आणि संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीईओपी) येथे आयोजित कार्याक्रमात  विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी.बी. आहुजा, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सामंत म्हणाले, कोरोना महामारीच्या प्रारंभी या विषाणूचे स्वरुप माहिती नसल्याने विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची सुरक्षितता लक्षात घेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर न्यायालयीन याचिका झाल्यावर राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाने देशात उत्कृष्ट अशा ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रात घेतल्या. आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे दिसल्याने विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन, शिक्षण परत  व्यवस्थित सुरू करण्यासाठी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

महाराष्ट्रातील शैक्षणिक सुविधा देशात प्रगत आहेत. विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी ऑफलाईन शिक्षण आणि परीक्षा घेण्यास शासनाचे प्राधान्य राहील. परंतु, काही ठिकाणी अपरिहार्यता असल्यास ऑनलाईन शिक्षण व परीक्षा घ्याव्या लागल्या तरी त्याबाबतही शासन परिस्थितीनिहाय सकारात्मक निर्णय घेईल. महाविद्यालये सुरक्षित वातावरणात सुरू व्हावीत यासाठी 'मिशन युवा स्वास्थ्य' अंतर्गत 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड लसीकरण करण्याचे भव्य अभियान हाती घेतले आहे. राज्यातील सुमारे 5 हजार महाविद्यालयात 40 लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण या मोहिमेअंतर्गत केले जाणार आहे. 
 

Web Title: national education policy 2020 uday samant nep implementation in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.