नाथ साहेबांच चांगभलं..! सवाई सर्जाचं चांगभलं!! चा जयघोष, लाखो भाविकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 18:16 IST2025-02-23T18:14:48+5:302025-02-23T18:16:12+5:30

- पारंपरिक मारामारीने श्री क्षेत्र वीर यात्रेची सांगता

Nath Saheb's good deeds..! Sawai Sarja's good deeds!! Chants of the song, presence of lakhs of devotees | नाथ साहेबांच चांगभलं..! सवाई सर्जाचं चांगभलं!! चा जयघोष, लाखो भाविकांची उपस्थिती

नाथ साहेबांच चांगभलं..! सवाई सर्जाचं चांगभलं!! चा जयघोष, लाखो भाविकांची उपस्थिती

नीरा : गेली बारा दिवस गुलालाची मुक्त उधळण करत सुरू असलेल्या श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे उत्सवाची सांगता मानकरी समस्त जमदाडे परिवार यांच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नैवेद्य दाखवून, रंगाचे शिंपन करून पारंपरिक मारामारीने (रंगाचे शिंपण) करण्यात आली. यावेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत नाथ साहेबांच चांगभलं!! सवाई सर्जाचं चांगभलं!! जयघोष करत  पालख्यां व  वीस गावाच्या मानाच्या काट्यावर फुलांची उधळण करत यात्रेची सांगता करण्यात आली असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने राजेंद्र धुमाळ यांनी सांगितले.

''मारामारी'' निमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन कोडीतची मानाची पालखी प्रथम देऊळवाड्यात आली. त्यापाठोपाठ कन्हेरी, वाई, सोनवडी, भोंडवेवाडी, कसबा पेठ (पुणे) या पालख्या व सोहळ्यातील वीस गावच्या वस्त्र धारण केलेल्या मानाच्या काट्या ढोल ताशा सह अबदागिरी, निशान, छत्री, दागिदार व सर्व मानकरी मंदिरात आले. मानाच्या पालख्या व काट्यांच्या मंदिराला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर देऊळ वाड्यातील दगडी कासवावर तात्याबा बुरुंगले, दादा बुरुंगले यांची भाकणूक (भविष्यवाणी) सांगण्यात आली. या भविष्यवाणी मध्ये यावर्षी बाजरीचे पीक जोमात येणार असून, मृगाचे पाणी चार खंडात पडेल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल. हत्तीचे पाणी चार खंडात पडून जनतेचे समाधान होईल. उतरा, पूर्वा, तीन खंडात पडेल, चौथ्या खंडात साधारण राहील. गाई गुरे रोगराई हटली आहे, मनुष्याच्या मागे खाता पिता आटापिटा राहिल ज्याची गादी त्याला मिळणार असल्याचे भविष्यवाणीत सांगण्यात आले. 

भाकणूकी नंतर दुपारी दीड वाजता देवाचे मानकरी समस्त जमदाडे यांच्यामार्फत श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपन करण्यात आले. यावेळी फुलांची उधळण व रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून सर्व पालख्या आपापल्या स्थळी गेल्या. बारा दिवस सुरू असलेला यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त प्रमिला देशमुख, सुनील  धुमाळ, विराज धुमाळ, अमोल धोंडीबा धुमाळ, श्रीकांत थिटे, बाळासाहेब समगीर, जयवंत सोनावणे, अलका जाधव आदी विश्वस्त मंडळ तसेच सल्लागार मंडळाने अथक परिश्रम घेतले असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी सांगितले आहे.

"चालू वर्षाचा यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्याकरिता सहकार्य केलेल्या सर्व शासकीय निमशासकीय यंत्रणा, तसेच कोडीत, कन्हेरी, वाई, सोनवडी, राजेवाडी, भोंडवेवाडी, कसबा(पुणे) वीर पालखी, सर्व मानकरी, सालकरी, दागीनदार, ग्रामस्थ तसेच श्रीनाथांच्या दर्शनासाठी आलेले लाखो भाविक, देणगीदार, ज्ञात-अज्ञात सर्वानीच मोलाचे सहकार्य केल्याने यात्रा निर्विघ्नपणे मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्याबद्दल सर्वांचे आभार"

Web Title: Nath Saheb's good deeds..! Sawai Sarja's good deeds!! Chants of the song, presence of lakhs of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.