पुण्यात परदेशी नागरिकांसह तिघांकडून १० लाखांचे अमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:07 IST2024-01-25T14:05:44+5:302024-01-25T14:07:09+5:30
त्यांच्याकडून १० लाखांचे कोकेन आणि मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले...

पुण्यात परदेशी नागरिकांसह तिघांकडून १० लाखांचे अमली पदार्थ जप्त
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज तस्करांवर करडी नजर ठेवली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मार्केटयार्ड आणि कोंढवा परिसरात कारवाई करून परदेशी नागरिकांसह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १० लाखांचे कोकेन आणि मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
मार्केटयार्ड येथील पितळे नगर रोड येथे २० जानेवारी रोजी एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी परदेशी नागरिक येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून जोसेफ रोतीमी (३०, सध्या रा. मीरा रोड) याला अटक केली. त्याच्याकडून ६ लाख २८ हजार ८०० रुपयांचे ३१.४४ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. जोसेफ रोतीमी विरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा येथील भाग्योदय नगर येथे अमली पदार्थ विक्रीसाठी दोघे येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार अझीम शेख यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून जावेद अजीज सय्यद (३७, रा. अंधेरी, मुंबई) आणि मोहम्मद रफिक हाशीम (४७, मीरा रोड, ठाणे) यांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाखांचे १० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. आरोपी जावेद आणि मोहम्मद यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुणे रेल्वे स्थानक परिसरात मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या शेबाज शब्बीर कुरेशी (२६, वडाला, मुंबई) याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६९ हजार किमतीचे ८.४८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याच्या विरोधात बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलिस अंमलदार योगेश पांढरे, साहिल शेख, संदीप जाधव, महेश साळुंखे यांच्या पथकाने केली.