Nagraj Manjule : खाशाबा जाधव चित्रपटाचा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर, नागराज मंजुळे यांना समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 21:09 IST2024-11-26T21:07:09+5:302024-11-26T21:09:16+5:30
Nagraj Manjule :

Nagraj Manjule : खाशाबा जाधव चित्रपटाचा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर, नागराज मंजुळे यांना समन्स
पुणे : खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने समन्स बजावले आहे. “ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव” पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे यांनी हक्कांचे उल्लंघन केल्याचा दावा दाखल केला आहे. न्यायालयाने या प्रकरणात मंजुळेंसह जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन आणि निर्माती ज्योती देशपांडे यांना देखील समन्स बजावले आहे.
लेखकाला डावलून खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्याचा दुधाणे यांचा आरोप आहे. चित्रपट निर्मिती व प्रदर्शनावर मनाई करण्याची मागणी दुधाणे यांच्याकडून न्यायालयात करण्यात आली आहे.
वादाची सुरुवात
2019 मध्ये नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याशी चित्रपट निर्मितीसाठी करार केला. लेखक दुधाणे यांना याबाबत अनभिज्ञ ठेवून घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. 2013 सालीच रणजीत जाधव यांनी पत्रकार परिषदेत या पुस्तकावर चित्रपट तयार केला जाईल असे जाहीर केले होते. मात्र, पुढे लेखकाला डावलून झालेल्या करारामुळे दुधाणे यांनी कॉपीराईट कायद्याच्या उल्लंघनाचा दावा केला आहे.
बैठका निष्फळ
2019 पासून नागराज मंजुळे व लेखक यांच्यात चार वेळा बैठक झाली. 2022 मध्ये लेखकाने नोटीसही पाठवली. त्यानंतर 2023 आणि 2024 मध्ये झालेल्या बैठकींमध्ये लेखकाशी चर्चा करून मानधन व हक्कांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले. मात्र, यातून मार्ग न निघाल्याने दुधाणे यांनी न्यायालयात दावा दाखल केला.
दुधाणे यांनी 2001 साली प्रकाशित केलेले “ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव” हे पुस्तक खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित पहिले आणि एकमेव पुस्तक आहे. या पुस्तकाच्या 15 आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, याला राज्य पुरस्कारही मिळाला आहे. तेजपाल वाघ यांनी या पुस्तकावर आधारित पटकथा तयार केली होती. मात्र, लेखकाला डावलून चित्रपट निर्मिती सुरू केल्याच्या आरोपांनंतर हा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.