"त्याच्या’मुळे माझ्या मुलाची शाळा बदलली"; कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीबाबत मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 10:11 IST2024-05-23T10:09:36+5:302024-05-23T10:11:10+5:30
सोनाली तनपुरे यांनी ट्वीट करून हा आरोप केला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे हे मामा-भाचे आहेत.

"त्याच्या’मुळे माझ्या मुलाची शाळा बदलली"; कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीबाबत मोठा गौप्यस्फोट
पुणे : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीबाबत मोठा गौप्यस्फोट शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी केला आहे. घटनेतील मुलगा व माझा मुलगा एकाच वर्गात शिकत होता. त्या वेळी त्यांच्याकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली असल्याची खंत व्यक्त केली आहे.
सोनाली तनपुरे यांनी ट्वीट करून हा आरोप केला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे हे मामा-भाचे आहेत. मुलाची दखल वेळीच घेतली गेली असती, तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. हा मुलगा किती मुजोर होता, हे त्याच्या शाळेतील कृत्यातूनच दिसून येत होते. त्यामुळे बिल्डरच्या या मुलासह काही मुलांची तक्रार त्यांच्या पालकांकडेही केली होती; परंतु दखल घेतली गेली नाही, असे सोनाली तनपुरे यांनी सांगितले.
पोर्शेला रस्त्यांवर वर्षभरासाठी बंदी
अपघातावेळी वाहनचालक अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्याने या कारची नोंदणी रद्द करण्यात आली असून, संबंधित कारचालकाला वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत वाहन परवाना देण्यात येणार नाही, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली. ‘बाळ’ १८ वर्षांचा नसतानाही त्याला कार दिल्यामुळे बाळाच्या बापालाही ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अग्रवालच्या अडचणीत वाढ झाली.