आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमातून सांगीतिक पर्वणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 07:00 IST2019-12-08T07:00:00+5:302019-12-08T07:00:02+5:30
संगीताचे नमुने संकेतस्थळावर उपलब्ध

आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमातून सांगीतिक पर्वणी!
- प्रज्ञा केळकर-सिंग -
पुणे : फ्लेम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. विनोद विद्वांस यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर करून भारतीय संगीत निर्माण करणारी एक ' आर्टिफिशियल इंटेलिजेंट क्रिएटिव्ह एक्सपर्ट सिस्टीम ' विकसित केली आहे. ही एक्सपर्ट सिस्टीम आपण दिलेल्या रागात बंदिश (तयार करते आणि पारंपारिक शास्त्रीय शैलीमध्ये प्रस्तुत करते. भारतीय संगीत तसेच संगणकक्षेत्रातही अशा प्रकारचे काम प्रथमच झाले आहे.
डॉ. विद्वांस जवळपास पंचवीस वर्षं ते या संकल्पनेवर काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी भरतमुनिंची २२ श्रुतींची संकल्पना निर्देशित करणारे भरतवीणा नावाचे स्वतंत्र वाद्य डिझाइन केले आहे. या भरतवीणेवर भरतमुनींच्या २२ श्रुती वाजवता येतात. या संगणक प्रणालीची चाचणी हंसध्वनी, धनाश्री, मालकंस, मारूबिहाग, कलावती, देश, बिलासखानी तोडी, आणि भैरवी अशा अनेक रागांद्वारे केली जात आहे. यासाठी त्यांनी भारतीय संगीतासाठी संगणकीय मॉडेल तयार केले आहे. संगणकाने तयार केलेल्या भारतीय संगीताचे नमुने http://computÔtio»»fÔlmusic.com वेबसाईटवर ऐकता येतील.
'लोकमत' शी बोलताना डॉ. विद्वांस म्हणाले, 'हिंदुस्थानी तसेच कर्नाटकी संगीताला समान आधारभूत नारदीयशिक्षा, भरताचे नाट्यशास्त्र, आणि शारंगदेवाचे संगीतरत्नाकर अशा भारतीय संगीतावरील प्राचीन ग्रंथांचा व्यापक अभ्यास केल्यामुळे ही एक्सपर्ट सिस्टीम विकसित करणे शक्य झाले.
तंत्रज्ञानामधील प्रगतीमुळे संगीत-निर्मितीसाठी नवनवीन मार्ग खुले झाले आहेत. जगभर बरेच संगीत अभ्यासक या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा या बद्दल विचार करत आहेत. संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरुन ह्यसंगणक-निर्मितह्ण भारतीय संगीत किंवा संगणकीय भारतीय संगीत निर्माण होते. या एक्सपर्ट सिस्टीम मध्ये कोणतीही मानवी मदत न घेता, रागाचे आरोह-अवरोह आणि वादी व संवादी स्वर दिले की संगणक नवीन बंदिश तयार करतो. प्रत्येक बंदिश तयार झाली की टेक्स्ट फाईलही तयार होते. त्यावरून आपल्याला प्रत्येक बंदिशीचे विश्लेषण करता येते.'
ही एक्सपर्ट सिस्टीम भारतीय शास्त्रीय संगीतातील एखाद्या तज्ञाप्रमाणे काम करते. भारतीय संगीताची तत्त्वे, संकल्पना आणि पारंपारिक ज्ञान या एक्सपर्ट सिस्टीम मध्ये नियमांच्या स्वरुपात एन्कोड केले आहेत. नियमांचे पालन करून एखाद्या रागासाठी योग्य आलाप, तान आणि स्वर-विस्तार तयार करण्यास सक्षम आहे. या सिस्टीमला रागाचे केवळ आरोह, अवरोह, वादी आणि संवादी एवढी माहिती फीड करुन दिली तर एका क्लिकवर नवीन बंदिश तयार होते.
सामान्य श्रोत्यासाठी, एखाद्या वेळी विशिष्ट राग ऐकण्याची इच्छा असल्यास त्या रागात नवीन रचना तयार करण्यासाठी ही सिस्टीम हे एक सुलभ साधन आहे. ह्यतयार झालेली रचना तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ती जतन करुन पुन्हा पुन्हा ऐकू शकता. ही यंत्रणा पुनरावृती न करता नवीन रचना तयार करत राहते. सध्या ही यंत्रणा कृत्रिमरित्या तयार केलेल्या वाद्यांच्या आवाजामध्ये वाजते. ज्यामध्ये बासरीसारखा आवाज, सनई/ व्हायोलिन, सरोद, तानपुरा यासारखे तारवाद्य, असे कृत्रिम आवाज तयार होतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
संगीतामागील विज्ञान, तर्कशास्त्र समजून घ्यायला हवे
या ग्रंथांच्या अभ्यासामुळे संगणकावर भारतीय शास्त्रीय संगीत निर्मितीसाठी एक सैद्धांतिक चौकट विकसित झाली आहे. हे संशोधन व तदानुशंगिक एक्सपर्ट सिस्टीम भारतीय शास्त्रीय संगीताच्या संगणकीय सिद्धांतासाठी आधार प्रदान करते. भारतीय शास्त्रीय संगीताचा हा संगणकीय सिद्धांत आणि ही एक्सपर्ट सिस्टीम भारतीय संगीतातील श्रुती (मायक्रॉटोन्स), रागांचे वर्गीकरण, चलन आणि पकड, वादी-संवादी, रागाचे मुख्य स्वर आणि बंदिशींची रचना यासंबंधी काही मुलभूत विचार करते. या संपूर्ण प्रयत्नांमागची मुख्य प्रेरणा म्हणजे या संकल्पनांचे विश्लेषण करणे आणि पारंपारिक भारतीय संगीतामागील विज्ञान आणि तर्कशास्त्र समजून घेणे ही आहे, असे डॉ. विद्वांस म्हणाले.