पुण्यात चाेर समजून तरुणाचा खून; तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:52 IST2022-12-24T13:51:08+5:302022-12-24T13:52:49+5:30
मागील तीन महिने आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता....

पुण्यात चाेर समजून तरुणाचा खून; तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक
पुणे : चोर समजून तरुणाला बेदम मारहाण करीत त्याचा खून करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली. तरुणाला मारहाण केल्यानंतर मागील तीन महिने आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.
राजू उत्तम गायकवाड (वय ४५, रा. राजेंद्रनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गांपातसिंग गोकुलसिंग मेरावी असे मारहणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी याप्रकरणी सुदर्शन भेगडे, प्रकाश कंक, सूरज जोगरे, सतीश केमनाळ, विशाल शिंदे, दीपक एवळे, राहुल सरोदे यांना अटक केली होती, तर आरोपी गायकवाड पसार झाला होता.
फरार आराेपी हा हिंगणे भागात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलिस शिपाई राकेश टेकावडे यांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, शरद वाकसे, सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, साईनाथ पाटील, राकेश टेकावडे आदींनी ही कारवाई केली.