घरी सोडतो म्हणत शेतात नेऊन तरुणीची केली हत्या; आरोपी बिंधास्त फिरत होता गावात
By नारायण बडगुजर | Updated: April 13, 2025 23:19 IST2025-04-13T23:11:00+5:302025-04-13T23:19:06+5:30
नराधमला पोलिसांनी अटक केली असून आठ दिवसाची कोठडी सुनावली आहे.

घरी सोडतो म्हणत शेतात नेऊन तरुणीची केली हत्या; आरोपी बिंधास्त फिरत होता गावात
राजगुरुनगर: मांजरेवाडी धर्म (ता खेड ) येथे महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात दि. १२ रोजी दुपारी मिळून आला होता. या गंभीर घटनेबाबत आरोपी नवनाथ कैलास मांजरे ( वय २९ रा, मांजरेवाडी धर्म ता खेड ) या नराधमला पोलिसांनी अटक केली असून आठ दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडित अल्पवयीन मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती.११ इयत्तेची परीक्षा देऊन क्लाससाठी ती महाविद्यालयात नेहमीप्रमाणे येत होती.
दि. ११ रोजी राजगुरुनगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास घरी जाण्यासाठी पाबळ रोड येथे थांबली असताना,आरोपी नवनाथ मांजरे तिथे आला. घरी यायचे का असे म्हणून पिडितेला दुचाकीवर बसविले. दरम्यान मला उसाच्या शेताला दोन पाण्याची बारी द्यायची आहे असे मुलीला सांगुन मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी या मार्गच्या रस्त्याने त्याच्या नदी काठच्या उसाच्या शेतात नेले. आरोपीने पिडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.पिडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने पीडित मुलीच्या डोक्यात शेतातील दगड उचलून टाकला. तिचा मुत्यदेह शेतालगतच असणाऱ्या भिमा नदीच्या पात्रात दिडशे फुट ओढत नेऊन टाकला, अशी आरोपीने कबुली दिली असल्याचे महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल राजे यांनी सांगितले.
मुलीवर लैंगिक अत्याचार झाले का नाही? याबाबत डॉक्टकडून पीएम रिपोर्ट येणे बाकी आहे. आरोपी उलटसुलट उत्तरे देत असुन कसून तपास सुरू आहे. दोन दिवसात सत्य बाहेर येईल. यासाठी आरोपीला आठ दिवसाची पोलिस कस्टडी दिली आहे - स्नेहल राजे (महिला पोलीस उपनिरीक्षक, खेड ठाणे )
रविवार दि. १३ रोजी पिडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा सोहळा गावातच होणार होता. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र आदल्या दिवशीच छोट्या बहिणीचा खून झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपी गावामधीलच असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गाव ते स्माशानभुमी पर्यत कुठलाही अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. यावेळी ग्रामस्थ व नातेवाईकांनी आरोपीला फाशी द्यावी. अशी मागणी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे केली.
आरोपी घटना घडल्यानंतर बिनदक्तपणे गावात हिंडत होता जसे काही घडलेच नाही. घटनेनंतर तो जऊळके येथे यात्रेला जाऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंती निमित्त स्वःताच्या किराणा दुकानात नारळ विकत होता. तसेच माझ्या शेतात नदीलगत कोणीतरी बाईचा ओरडण्याचा आवाज आला आहे. मी घाबरून तिकडे गेलो नाही, असे गावात सांगत होता.