‘मसाप’ सभेत लोकशाहीचा खून ! चर्चेविनाच घटना दुरूस्ती मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:45 IST2024-12-28T16:44:23+5:302024-12-28T16:45:04+5:30
काही सदस्यांकडून तीव्र निषेध

‘मसाप’ सभेत लोकशाहीचा खून ! चर्चेविनाच घटना दुरूस्ती मंजूर
पुणे :महाराष्ट्र साहित्य परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.२८) वादळी वातावरणात झाली आणि घटना दुरूस्ती चर्चेविनाच आवाजी मतदानांनी मंजूर करण्यात आली. काही सदस्यांनी त्याचा निषेध करत घटना दुरूस्तीवर चर्चा घ्यावी, अशी मागणी केली. परंतु, त्यांना काही सदस्यांनी व कोषाध्यक्षांनी खाली बसवत अध्यक्षांना दुरूस्तीला मंजुरी दिल्याची घोषणा करायला लावली. ‘हा लोकशाहीचा खून आहे,’ अशी तीव्र संताप काही सदस्यांनी व्यक्त करून या निर्णयाचा निषेध केला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटना दुरुस्तीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.२८) नवी पेठेतील पत्रकार भवन येथे दुपारी दोन वाजता आयोजिली होती. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, राजीव बर्वे, रवींद्र बेडकीहाळ, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते. या सभेमध्ये संस्थेचे मानद अध्यक्षपद विसर्जित करून कार्याध्यक्ष हेच अध्यक्ष हा ठराव मांडण्यात आला. घटनादुरुस्तीला मान्यता मिळाल्याने कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार अध्यक्षांकडे वर्ग होणार आहे.
तसेच पुढील काळात अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. प्रस्तावित घटनेमध्ये पदाधिकाऱ्यांची पूर्वीच्या संख्येत वाढ होणार आहे. तीन उपाध्यक्ष पदांची संख्या आता चार करण्यात आली. एक कोषाध्यक्ष, एक प्रमुख कार्यवाह, सात कार्यवाह, दोन स्वीकृत सदस्य, दोन विभागीय कार्यवाह आणि मसाप साहित्य पत्रिकेचे संपादक अशी प्रस्तावित पदाधिकारी संख्या आहे. प्रस्तावित घटना दुरुस्तीची प्रत www.sahityaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच कार्यकारिणीवरील पदे हे पुण्याबाहेरील देखील असणार आहेत. पण त्यामुळे मसापचा कार्यभार चालणार कसा ? असा सवाल उपस्थित होत आहे. रावसाहबे कसबे म्हणाले, सत्तेचे विक्रेंदीकरण आम्ही केले आहे. त्यामुळे सर्वांकडे अधिकार असतील.’’ पण त्यामुळे मसापमधील कार्यक्रमांचे नियोजन करताना प्रत्येक वेळी बाहेरून पदाधिकारी पुण्यात येतील का ? हा ताळमेळ कसा चालणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कोषाध्यक्षांच्या हाती सभेची सुत्रे !
घटना दुरूस्तीचा प्रस्ताव सभेसमोर ठेवल्यानंतर आवाजी मतदान झाले आणि मंजूर केला. पण त्याला सदस्य विनायक आंबेकर यांच्यासह काही जणांनी विरोध केला. यावर चर्चा करावी, अशी मागणी केली. परंतु, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी त्याला न जुमानता सभा पुढे रेटली. खरंतर सभा प्रमुख कार्यवाह चालवत असतात, ही सभा कोषाध्यक्षांनी हातात घेतली आणि विरोध करणाऱ्यांना कोषाध्यक्षांनी चार टाळकी असं संबोधले. त्याचाही निषेध करण्यात आला.
विरोध करणाऱ्यांना दमदाटी !
ज्या सदस्यांनी घटना दुरूस्तीवर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली, त्यांच्यावर काही सदस्य धावून गेले. त्यामुळे सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. ‘मसाप’च्या सभेमध्ये दमदाटी आणि अरेरावी करण्यात आल्याचे पहायला मिळाले. अनेकांनी त्याचा निषेध केला.
पुरोगामी म्हणवणाऱ्या रावसाहेब कसबे यांनी या सभेमध्ये लोकशाहीचा खून केला. घटना दुरूस्ती चर्चेविनाच मंजूर केली. चर्चा करणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. हा एक प्रकारचे जोरजबरदस्तीच आहे. - विनायक आंबेकर, आजीव सदस्य, ‘मसाप’