चकवा देत सुरक्षा भेदली, येरवडा जेलमधून फिल्मी स्टाइल पलायन; फरार झालेला कैदी नक्की कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 01:25 PM2023-11-21T13:25:50+5:302023-11-21T13:32:06+5:30

पुण्यातील येरवडा कारागृहातून हत्येच्या गुन्ह्यातील कैदी फरार झाल्याने खळबळ उडाली असून पोलिसांकडून फरार कैद्याचा शोध घेतला जात आहे.

Murder case convict escapes from Yerawada jail in Pune | चकवा देत सुरक्षा भेदली, येरवडा जेलमधून फिल्मी स्टाइल पलायन; फरार झालेला कैदी नक्की कोण?

चकवा देत सुरक्षा भेदली, येरवडा जेलमधून फिल्मी स्टाइल पलायन; फरार झालेला कैदी नक्की कोण?

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृह प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण कारागृह प्रशासनाच्या हातावर तुरी देत एक कैदी पसार झाल्याचं उघड झालं आहे. आशिष जाधव असं कारागृहातून पसार झालेल्या कैद्याचं नाव असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव या कैद्याचं कारागृहातील वर्तन पाहून त्याच्याकडे रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. मात्र काल दुपारच्या सुमारास कारागृह अधिकाऱ्यांकडून कैद्यांची मोजणी करण्यात येत असताना एक कैदी उपस्थित नसल्याचं आढळून आलं. त्यानंतर आशिष जाधव हा हत्येच्या गुन्ह्यातील कैदी फरार झाल्याचं स्पष्ट झालं.

कोण आहे आशिष जाधव?

पुण्यातील वारजे माळवाडी येथे २००८ मध्ये एक हत्याकांड झालं होतं. या प्रकरणात पोलिसांनी आशिष जाधव याला अटक केली होती. हत्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. तेव्हापासून तो शिक्षा भोगत होता. जाधव याचे वर्तनही चांगले असल्याने त्याला रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. मात्र काल त्याने सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत कारागृहातून पोबारा केला. 

खुनाच्या गुन्ह्यातील कैदी पळून गेल्याने कारागृह प्रशासनाची नाचक्की झाली असून पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले आहे.

दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने येरवडा कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे. यापूर्वी कारागृहातील काही कैद्यांकडे मोबाईल सापडले होते. त्यानंतर आता कैदी फरार झाल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.
 

Web Title: Murder case convict escapes from Yerawada jail in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.