महापालिका लवकरच सुरू करणार स्वत:ची रक्तपेढी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 12:05 PM2019-11-11T12:05:27+5:302019-11-11T12:09:37+5:30

हिंगणे खुर्द येथे जागा : पीपीपी तत्त्वावर रक्तपेढी सुरू होणार

Municipal corporation will soon launch its own blood bank | महापालिका लवकरच सुरू करणार स्वत:ची रक्तपेढी

महापालिका लवकरच सुरू करणार स्वत:ची रक्तपेढी

Next
ठळक मुद्देशहरातील कोणत्याही प्रसूतिगृहांमध्ये त्वरित रक्त उपलब्ध करून देणे शक्य होईल३० वर्षांच्या कराराने पीपीपी तत्त्वावर रक्तपेढी सुरू करण्याचा प्रस्ताव

सुषमा नेहरकर-शिंदे - 
पुणे : शहरातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वत:ची स्वतंत्र रक्तपेढी सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या हिंगणे खुर्द येथील इमारतीमध्ये पीपीपी तत्त्वावर ही रक्तपेढी सुरू करण्यात येणार असून, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने खासगी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वयंसेवी संस्था यांच्याकडून एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट (स्वरस्य प्रस्ताव) मागविण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आरोग्य विभागाने महापालिका आयुक्तांना दिला आहे.
शहरामध्ये सध्या महापालिकेचे १ सर्वसाधारण रुग्णालय, १ सांसर्गिक रुग्णालय, १८ प्रसूतिगृहे व ४७ दवाखाने असून, यामार्फत नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातात; परंतु सध्या शहरामध्ये महापालिकेच्या मालकीची स्वतंत्र अशी एकही रक्तपेढी नाही. सध्या महापालिकेच्या प्रसूतिगृहाकडील रक्त घेण्याकरिता सुविधा उपलब्ध आहेत; परंतु महापालिकेची रक्तपेढी नसल्याने अडचण येते. यामुळेच महापालिकेने स्वत:ची रक्तपेढी सुरू केल्यास प्रसूतिगृह व इतर रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या गरजू महिला व रुग्णांना रक्ताची सोय उपलब्ध करून देणे सोपे होणार आहे.
आरोग्य विभागाने आयुक्तांना प्रस्ताव देताना महापालिकेची प्रभाग क्रमांक ३४ येथील सर्व्हे नंबर २४/६ हिंगणे खुर्द येथील इमारत बांधून तयार असून, ही इमारत महापालिकेच्या मालमत्ता विभागाने आरोग्य विभागाकडे वर्ग केली आहे. सदर इमारतीचा तळमजला पार्किंग, स्टील मजला- २२१.३५ चौ.मी., पहिला मजला- २४४.६४ मजला आणि दुसरा मजला २३५.३० असे एकूण ७०१.२९ चौ.मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. 
सध्या मनुष्यबळाअभावी सदर इमारतीचा वापर होत नसला, तरी लवकरच पीपीपी तत्त्वावर येथे रक्तपेढी व रक्तसंकलन केंद्र 
सुरू होऊ शकते, असा प्रस्ताव दिला आहे. या इमारतीमध्ये स्टील मजल्यावर सुसज्ज प्रसूतिगृह आणि पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर रक्तपेढी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
 

मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल
सध्या महापालिकेच्या १८ प्रसूतिगृहांमध्ये महिलांची गर्दी असते. महापालिकेच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात; परंतु डिलेव्हरीदरम्यान महिलांना अनेकवेळा रक्ताची गरज भासते. महापालिकेच्या वतीने स्वत:ची रक्तपेढी सुरू केल्यास, शहरातील कोणत्याही प्रसूतिगृहांमध्ये रक्ताची गरज भासल्यास त्वरित रक्त उपलब्ध करून देणे शक्य होईल. यामुळे शहरातील मातामृत्यूचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत होईल. यामुळे महापालिका आणि खासगाी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ३० वर्षांच्या कराराने पीपीपी तत्त्वावर रक्तपेढी सुरू करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या वतीने आयुक्तांना दिला आहे.- डॉ. रामचंद्र हंकारे,  आरोग्य अधिकारी

Web Title: Municipal corporation will soon launch its own blood bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.