मेट्रोच्या जागेतील ५० झोपड्या महापालिकेने हटविल्या

By राजू हिंगे | Updated: January 18, 2025 09:31 IST2025-01-18T09:30:35+5:302025-01-18T09:31:09+5:30

अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी पुणे मेट्रोच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती.

Municipal Corporation removes 50 huts from metro area | मेट्रोच्या जागेतील ५० झोपड्या महापालिकेने हटविल्या

मेट्रोच्या जागेतील ५० झोपड्या महापालिकेने हटविल्या

पुणे : शिवाजीनगर दिवाणी न्यायालय (सिव्हिल कोर्ट) मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या डेंगळे पुलाजवळ उभारण्यात आलेल्या ५० झोपड्यांवर कारवाई केली. मेट्रोच्या जागेत या बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी पुणे मेट्रोच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती.

शहरातील रस्त्यांवर वाढत असलेले अतिक्रमण, बेकायदा फेरीवाले तसेच अनधिकृत बांधकामे यावर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी कारवाई करण्याचे आदेश महापालिकेतील विविध विभागांना दिले आहेत. त्यानुसार मेट्रोच्या जागेत उभारण्यात आलेल्या झोपड्यांवर कारवाई करून त्या काढून टाकण्यात आल्या. पहाटे साडेपाच ते दहा या वेळेत ही कारवाई करण्यात आली.

पुणे महपालिकेचे परिमंडळ दोनचे उपायुक्त अविनाश संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये सहायक महापालिका आयुक्त गोविंद दांगट, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ४ पोलिस निरीक्षक, सुरक्षा अधिकारी व इतर विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. पुणे मेट्रोच्या जागेतील बेकायदा अतिक्रमण काढून टाकण्यात आले आणि येथील साहित्य मेट्रो विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मेट्रोची स्थानके उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा महापालिकेने मेट्रोकडे हस्तांतरित केलेल्या आहेत. महापालिकेकडून देण्यात आलेल्या या जागांची काळजी घेणे, निगा राखणे, त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही याकडे लक्ष देण्याची जबाबदारी महामेट्रोची आहे. मात्र, महामेट्रो प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. यापुढे तरी मेट्रोने गांभीर्याने पाहून यापुढील काळात अतिक्रमणे होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Web Title: Municipal Corporation removes 50 huts from metro area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.