मिळकत कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:42 IST2018-11-13T16:39:46+5:302018-11-13T16:42:21+5:30
महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे..

मिळकत कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली
पुणे: पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. आतापर्यंत ८४२ कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल झाला असून, पुढील चार महिन्यांत तब्बल १ हजार कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे. त्यामुळे मिळकत कराची मोठी वसुली करण्यासाठी मिळकर विभागाच्या वतीने स्वतंत्र पाच पथकांची नियुक्ती केली असून, यामध्ये थकबाकीदारांच्या घरासमोर येत्या १ डिसेंबर पासून बॅन्ड वाजविण्यात येणार असल्याचे मिळकत कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.
महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये आता पर्यंत केवळ ८४२ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. शहरामध्ये तब्बल ९ लाख मिळकतींच्या नोंदी असून, त्यांच्या कराची मागणीही सुमारे १२०० कोटींवर आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात कर वसूली शिल्लक आहे. त्यामुळे या विभागाकडून पुढील चार महिन्यांत थकबाकी वसूलीसाठी विशेष उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले.
गतवर्षी महापालिकेला मिळकतकरातून १०८४ कोटी रुपये मिळाले होते. यंदा १८०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट दिले असले तरी प्रशासनाला यामधून १२०० कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यात जास्तीत जास्त थकबाकी वसुल करण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावा लागणार आहे. यासाठीच प्रशासनाच्या वतीने खास पथकांची नियुक्ती केली असून, यामध्ये बँन्ड पथकाचा देखील समावेश आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये तब्बल १ लाख ४२ हजार मिळकतीची नोंदी आहेत. या मिळकतीमधून महापालिकेला सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.