मुंबई, सिंगापुर, अबुधाबी विमाने जमिनीवरच....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 07:00 IST2019-10-01T07:00:00+5:302019-10-01T07:00:05+5:30
सिंगापुर व अबुधाबीकडे जाणाऱ्या विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता..

मुंबई, सिंगापुर, अबुधाबी विमाने जमिनीवरच....
पुणे : जेट एअरवेज कंपनी बंद पडल्यानंतर सिंगापुर, अबुधाबी या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह मुंबई, इंदौर व कोईम्बतुर ही विमाने मागील काही महिन्यानंतरही जमिनीवरच आहेत. इतर विमानकंपन्यांकडून या शहरांसाठी सेवा सुरू करण्यास उदासिनता दाखविली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर पयार्यांचा विचार करावा लागत आहे. तसेच पुणे विमानतळावरील विमानांची दैनंदिन ये-जा १९० वरून १८० पर्यंत खाली आली आहे.
मागील काही वर्षात पुणे विमानतळावरून विमानाने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही संख्या पुढील वर्षभरात एक कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विमानतळावरून सध्या दुबई या एकमेव आंतरराष्ट्रीय उड्डाणासह दिल्ली, बेंगलुरू, कोची, अहमदाबाद, गोवा, चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद, जयपुर, बेळगाव, चंदीगढ, भोपाळ व नागपुर या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. तर मार्च महिन्यापर्यंत सिंगापुर व अबुधाबी या शहरांसाठीच्या सेवाही सुरू होता. देशांतर्गत सेवांमध्ये मुंबई, इंदौर व कोईम्बतुर शहरांच्या सेवा काही पाच महिन्यांपर्यंत सुरू होत्या. जेट एअरवेज कंपनीकडून या शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, ही कंपनी बंद पडल्यानंतर टप्प्याटप्याने सर्व विमाने जमिनीवर आली.
सिंगापुर व अबुधाबीकडे जाणाऱ्या विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पुण्यातून जाताना शनिवारी व येताना शुक्रवारी हे दिवस सोडल्यास आठवड्यातील इतर सर्व दिवशी विमानाचे उड्डाण होत होते. प्रत्येक उड्डाणाला ८० ते ८५ टक्के प्रवासी होते. पण विमानसेवा बंद झाल्याने प्रवाशांना इतर पर्याय निवडावे लागत आहेत. बहुतेक प्रवासी मुंबई, दिल्ली किंवा बेंगलुरू विमानतळावरून सिंगापुर, अबुधाबीकडे जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसाही खर्ची पडत आहे. मागील वर्षी जर्मनीतील फँकफर्टची विमानसेवाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद तसेच विमान कंपनीलाही ही सेवा परवडत नसल्याचे बंद करण्यात आली आहे. ही सेवा पुन्हा सुरू होण्याबाबत सध्या कोणतीच हालचाल नाही. त्यामुळे सध्या पुणे विमानतळावरून केवळ दुबई ही एकमेव आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे.
----------------