पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट-ब तसेच पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) भरतीची जाहिरात तब्बल सात महिन्यांनी उशिरा प्रसिद्ध झाल्याने हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या गंभीर अन्यायावर तातडीने निर्णय झाला नाही, तर येणाऱ्या महापालिका निवडणुकांत सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे.
शुक्रवारी (दि. २) भिडे पूल परिसरात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनास जरांगे-पाटील यांनी भेट देत पाठिंबा दर्शवत सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्लाबोल केला. परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाही वयोमर्यादा वाढीचा निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
एमपीएससी गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी (दि. ४) होणार असली, तरी वयोमर्यादेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. यासंदर्भात जरांगे-पाटील म्हणाले, “स्पर्धा परीक्षेची तयारी ही वर्षानुवर्षांची मेहनत असते. पाच–पाच वर्षे अभ्यास करून सरकारच्या चुकीमुळे संधी गमावणे हा सरळ अन्याय आहे. एमपीएससी व यूपीएससीसारख्या परीक्षा सोप्या नसतात; विद्यार्थ्यांना मुद्दाम अडचणीत आणले जात आहे.”
दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार आणि उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन मिळाल्याचे जरांगे-पाटील यांनी सांगितले. मात्र, आता केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस निर्णय अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “हा संघर्ष सरकारला परवडणारा ठरणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
पीएसआय भरतीची जाहिरात उशिरा निघाल्याने परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणात विद्यार्थी कुठेही दोषी नसून, गेल्या पाच–सहा महिन्यांपासून वयोमर्यादा वाढीसाठी निवेदने, आंदोलन करूनही शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने तातडीने शासन निर्णय काढून पीएसआय वयोमर्यादा वाढ जाहीर करावी, तसेच परीक्षा पुढे ढकलावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अन्यथा, राज्यभर आंदोलन छेडण्याचा निर्धारही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
परीक्षा दोन दिवसांवर आहे. रविवार, ४ जानेवारी गट ब व ११ जानेवारी गट क. या परीक्षा होणार आहेत. अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत. परीक्षा होणार आहे की पुढे जाणार आहे, हे स्पष्ट करावे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षासाठी गावी जायचं आहे. - महेश घरबुडे, अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन
“मी सहा वर्षांपासून एमपीएससीची तयारी करीत आहे. जाहिरात उशिरा निघाल्यामुळे माझी अखेरची संधी जाणार आहे. ही आमची चूक नाही, सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि वयोमर्यादा वाढवावी. - स्पर्धा परीक्षार्थी
“ग्रामीण भागातून येऊन भाड्याच्या खोलीत राहून अभ्यास केला. आता वयोमर्यादेमुळे बाहेर फेकले जात आहोत. आमच्या मेहनतीला न्याय हवा.” - स्पर्धा परीक्षार्थी
“दररोज दहा–बारा तास अभ्यास करूनही प्रशासनाच्या चुकीची शिक्षा आम्हाला मिळते आहे. वेळ आणि स्वप्ने सगळे पणाला लावून तयारी केली. एका उशिरा जाहिरातीमुळे सगळे संपतेय. - स्पर्धा परीक्षार्थी
Web Summary : Manoj Jarange-Patil backed protesting students against MPSC exam delays. He warned the government that failure to address age limit issues could cost them in upcoming elections. Students demand age limit extensions for PSI recruitment and exam postponement, threatening statewide protests.
Web Summary : मनोज जरांगे-पाटिल ने एमपीएससी परीक्षा में देरी के खिलाफ छात्रों के विरोध का समर्थन किया। उन्होंने सरकार को चेतावनी दी कि आयु सीमा के मुद्दे को हल करने में विफलता आगामी चुनावों में भारी पड़ सकती है। छात्रों ने पीएसआई भर्ती के लिए आयु सीमा बढ़ाने और परीक्षा स्थगित करने की मांग की, ऐसा न होने पर राज्यव्यापी विरोध की धमकी दी।