MPSC Result 2026: ...अखेर अंगावर खाकी वर्दी परिधान करणार अन् बाेहल्यावरही चढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:46 IST2026-04-09T12:45:58+5:302026-04-09T12:46:08+5:30
MPSC Result 2026 - सहायक निबंधक प्रदीप गाेरड यांचे डीवायएसपी हाेण्याचे स्वप्न साकार

MPSC Result 2026: ...अखेर अंगावर खाकी वर्दी परिधान करणार अन् बाेहल्यावरही चढणार
- उद्धव धुमाळे
पुणे : लहानपणीच खाकी वर्दीचं आकर्षण जडलेले... त्यामुळे कितीही आव्हाने आली तरी पीएसआय व्हायचेच... अशी मनाशी खूणगाठ बांधून शाळेत प्रवेश मिळवलेला. निश्चय इतका पक्का हाेता की, ‘अंगावर खाकी वर्दी चढवल्याशिवाय लग्नाच्या बाेहल्यावर चढायचे नाही’ असे स्वत:लाच बजावले हाेते. अखेर प्रयत्नांना यश आले आणि बुधवारी (दि. ८) प्रसिद्ध झालेल्या निकालाने ‘डीवायएसपी’ हाेण्याचे स्वप्न साकार झाले. मूळचे साेलापूरचे असलेल्या आणि सध्या पुण्यात सहकार विभागामध्ये वेल्हे येथे सहायक निबंधक म्हणून कार्यरत असलेल्या प्रदीप गाेरड यांची ही प्रेरणादायी कहाणी...
प्रदीप गाेरड हे मूळचे साेलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील घाेरडवाडी गावचे रहिवासी. आई-वडील दाेघेही निरक्षर. घरातला माेठा मुलगा असल्याने शाळेची पायरी चढण्याचा पहिला मान त्यांनाच मिळालेला. शालेय शिक्षण गावात आणि माळशिरस येथे पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निश्चय आधीच केलेला असल्याने बारावीनंतर बी.ए.साठी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागलाे. सुरुवातीला ‘पीएसआय’ व्हायचे मनाशी बाळगले हाेते; पण पुण्यात आल्यानंतर ‘डीवायएसपी’ पदाची क्रेझ लक्षात आली आणि आपण आता ‘डीवायएसपी’च व्हायचं असं ठरवून अभ्यास करू लागलाे.
ना शैक्षणिक वारसा, ना आर्थिक सुबत्ता.. तरीही प्रत्येक आव्हानांशी दाेन हात करत स्वयंअध्ययन करून परीक्षा देत असे. या काळात ‘द युनिक अकॅडमी’चे माॅक इंटरव्ह्यू दिले. तब्बल सहा वेळा मुलाखतीपर्यंत पाेहाेचलाे; पण १-२ मार्काने संधी हुकत असे. अखेर वर्ष २०२१ च्या परीक्षेत यश मिळाले; पण त्यात सहायक निबंधक पदावर समाधान मानावे लागले हाेते. त्यानंतरही प्रयत्न सुरू ठेवले. अखेर वर्ष २०२४ च्या परीक्षेत यश मिळाले. एनटी-सी गटात राज्यात अव्वल, तर खुल्या गटात दुसऱ्या क्रमांकावर यश मिळवले. ही अभिमानाची गाेष्ट आहे. मी अधिकारी हाेताच नातेवाइकांनी लग्नासाठी घाई सुरू केली हाेती; पण मी माझ्या निश्चयावर ठाम हाेताे. त्यामुळे सर्वांच्या आग्रहास्तव मुलगी पसंत करून लग्न जुळवून ठेवले. या वेळी मुलीला देखील स्पष्ट सांगितले हाेते की, ‘डीवायएसपी झाल्यावरच लग्नाच्या बाेहल्यावर चढायचं आहे’ त्याला संमती मिळाली. सर्वांच्या पाठबळामुळे आज यश संपादन करू शकलाे, असे प्रदीप गाेरड यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.
यशाला गवसणी घातल्यानंतर मी स्व-अनुभवातून एकच सांगेन की, प्रत्येकाने स्वप्न माेठी बघावीत. जिद्द आणि चिकाटी कायम ठेवावी. कठाेर परिश्रम, शिस्त, अभ्यासात सातत्य आणि संयम हे गुण अंगी बाळगल्यास यश हमखास मिळते. आधीच लग्न जमवलं हाेतं; पण ‘डीवायएसपी’ पदाची प्रतीक्षा करीत हाेताे. अखेर गाेड बातमी मिळाली. आता अंगावर खाकी वर्दी परिधान करणार अन् बाेहल्यावरही चढणार याचा आनंद आहे. - प्रदीप गाेरड, राज्यात दुसरा, एमपीएससी