आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:08 IST2025-06-16T11:02:04+5:302025-06-16T11:08:16+5:30

मावळमध्ये इंद्रायणी नदीवर पुल कोसळल्याच्या दुर्घटनेवरुन संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली

MP Sanjay Raut criticizes the government over the bridge collapse accident on the Indrayani river in Maval | आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल

आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल

Pune Maval bridge collapse:पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेत पुलावरून अनेक पर्यटक नदीत पडले आणि वाहून गेले. चार जणांचे मृतदेह सापडले असून ५० जणांना वाचवण्यात यश आले आहे. ३२ जण जखमी असून, सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेवरुन आता राजकारण देखील सुरु झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला.

मावळमध्ये रविवारी सुटीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी १००-१५० पर्यटक लोखंडी पुलावर उभे राहिले होते. यावेळी वजनाने अचानक पूल मधोमध तुटून कोसळला. त्यामुळे पुलावरील अनेकजण पाण्यात पडले आणि वाहून गेले. पूल कोसळला तेव्हा त्यावर शंभर ते दीडशे पर्यटक उभे होते. पुलाखालीही काहीजण बसले होते. या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाला. यावरुनच संजय राऊत यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र डागलं. अजित पवार या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहेत का? असं संजय राऊत म्हणाले.

"महाराष्ट्रात आणि देशात नवीन सरकार आल्यापासून सातत्याने अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले सुरु आहेत. काल दोन दुर्घटना घडल्या. मावळमधल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. या अपघातात नक्की किती लोक मृत्यू पावले आहेत याचा खरा आकडा समोर आलेला नाही. कित्येक लोक वाहून गेले. आपण विकासाच्या गोष्टी करता. त्या जिल्ह्याचे अजित पवार हे पालकमंत्री आहेत. त्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार आहे. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहात का? एक दोन कोटींचा पूल पालकमंत्री उभा करु शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान कामात झोपलेले असतात. मोठ्या बिल्डरांची ठेकेदारांची कामे यात ते जागे असतात. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण?" असा सवाल संजय राऊत यांनी केला.

"या पुलासाठी कागदावर पैसे मंजूर झाल्याचे म्हटलं जातंय. मग पूल का नाही झाला? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? मते विकत घ्यायला, आमदार खासदार विकत घ्यायला, लाडक्या बहि‍णींची पैसे विकत घ्यायला पैसे मिळतात. पण लोकांचे बळी गेलेला पूल दुरुस्त करायला पैसे नाहीत. रवींद्र चव्हाण यांचे ११ जुलै २०२४ चे एक पत्र माझ्याकडे आहे. पुलाच्या कामासाठी त्यांनी मंजुरी दिल्याचे पत्र होते आणि ते रवींद्र भेगडे यांना पाठवले होते. मंत्री सही करताना झोपून असतात. हे काम आठ कोटींचे आहे आणि रवींद्र चव्हाण यांनी ८० हजारांच्या पत्रावर सही केली. काल तो पूल कोसळला. हे या सरकारचे जनतेच्या प्रति असलेले प्रेम आहे," असं संजय राऊत म्हणाले. 
 

Web Title: MP Sanjay Raut criticizes the government over the bridge collapse accident on the Indrayani river in Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.