धर्मेंद्र, हेमा मालिनी यांच्या विरोधात खासदार संजय काकडे न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 23:21 IST2019-12-31T23:16:34+5:302019-12-31T23:21:41+5:30

10 जानेवारीला न्यायालयात सुनावणी; देओल कुटुंबीयांना उपस्थित राहण्याचे आदेश

mp sanjay kakade files case against dharmendra hema malini sunny deol | धर्मेंद्र, हेमा मालिनी यांच्या विरोधात खासदार संजय काकडे न्यायालयात

धर्मेंद्र, हेमा मालिनी यांच्या विरोधात खासदार संजय काकडे न्यायालयात

पुणेः लोणावळ्यातील 185 एकर जमिनीचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे. या जमिनीच्या वादातून भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडेंनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. धर्मेंद्र, हेमा मालिनी, अभिनेता खासदार सनी देओल, अभिनेता बॉबी देओल, अभिनेत्री ईषा देओल, उषा अजितसिंग देओल, अहाना धर्मंद्र देओल, प्रकाश देओल, विजयसिंग देओल, अजितसिंग देओल यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुणे न्यायालयात धाव घेतली आहे. लोणावळा येथील 185 एकर जागेच्या संदर्भात धर्मेंद्र यांचे कुटुंबीय आणि काकडे यांच्यात व्यवहार झाला होता, त्याप्रमाणे दोघे मिळून सदर जागेवर जे. डब्ल्यू. मेरियट रिसॉर्ट व बंगल्याची स्कीम करणार होते. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना पैसे देऊनही जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्यास ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप खासदार काकडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

काकडे म्हणाले, लोणावळामधील पुणे-मुंबर्इ द्रुतगती महामार्गाजवळील जागेबाबत 31 मे 2018 रोजी खासदार संजय काकडे आणि अभिनेता धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या कुटुंबीयांसोबत जागेचा व्यवहार निश्चित झाला. सदर ठिकाणी धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची एकूण 215 एकर जागा आहे. त्यापैकी 25 एकर जागेत धर्मेंद्र यांचा बंगला आणि आजूबाजूचा परिसर आहे. उर्वरित 185 एकर जागेपैकी 100 एकर जागेवर जे. डब्ल्यू. मेरियट हे आलिशान पंचतारांकित रिसॉर्ट उभारले जाण्याचे नियोजित आहे. यासाठी काकडे आणि धर्मेंद्र यांचे कुटुंबीय निम्मा-निम्मा खर्च करण्याचे ठरलेले आहे. त्यापैकी 30 टक्के उत्पन्न धर्मेंद्र कुटुंबीय तर 70 टक्के उत्पन्न काकडे घेणार असे ठरवण्यात आले. तर 85 एकर जागेवर संजय काकडे हे बंगल्यांची स्कीम बांधून त्याची विक्री करणार असून त्यातील नफ्याचे उत्पन्न दोघे मिळून निम्मे-निम्मे वाटून घेणार, असे निश्चित झाले. 

सदर व्यवहार दोघांमध्ये ठरल्यानंतर काकडे यांनी डिपॉझिट रक्कम धर्मेंद्र कुटुंबीयास दिली व त्यानंतर तातडीने जमिनीचे रजिस्ट्रेशन करून कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. मात्र, धर्मेंद्र व त्यांचे मुलांनी चित्रपटाचे काम होऊ दे, निवडणूक होऊ दे असे सांगत 18 महिने होऊनही रजिस्ट्रेशन करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे काकडे यांनी याबाबत धर्मेंद्र यांच्याकडे तसेच त्यांचे वकिलासोबत 20 वेळा बैठका घेऊनही पुढे काम जात नव्हते. 

काकडे यांनी सांगितले की, माझ्याकडून व्यवहार ठरल्यानंतर पैसे घेऊन ही पूर्ण जागा देण्यास नकार देत 85 एकर जागा घ्या आम्ही हॉटेलचे काम पाहतो असे सांगत टाळाटाळ केली गेली. माझ्यावर काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा ही प्रयत्न केला गेला, परंतु सदर व्यवहाराची कागदपत्रे पाहिल्यानंतर वरिष्ठ राजकीय नेत्यांनी ही माझी बाजू योग्य असल्याचे सांगितले. धर्मेंद्र कुटुंबीयांना दुसरी एखादी मोठी पार्टी व्यवहारासाठी मिळाली असावी. त्यामुळे माझ्यासोबत व्यवहार करण्यास ते टाळाटाळ करत आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी आर. व्ही. रोटे न्यायालयात 10 जानेवारी रोजी होणार असून संबंधित केसला धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना हजर राहण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.

Web Title: mp sanjay kakade files case against dharmendra hema malini sunny deol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.