वाल्हे : सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले पिंगोरी (ता. पुरंदर) गाव चारही बाजूने जयाद्री खोऱ्याच्या डोंगररांगा आणि घनदाट झाडीने वेढलेले आहे. मात्र डोंगराळ भागात वणवा लागल्याने सरपटणारे जीव, पशुपक्षी, औषधी वनस्पती, झाडाझुडपांचे जळून नुकसान होत असल्याने वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या वणव्यात अग्निज्वालांनी वनसंपदेसह असंख्य सूक्ष्मजीव, सरपटणारे प्राणी, पशुपक्षी या वणव्यात अक्षरश: होरपळले. यावेळी पक्ष्यांचा किलबिलाट नजरेस पडला. वणव्याने सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. पर्यावरणप्रेमींनी वणवा विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र वणव्याची आग मोठी असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले.
पिंगोरी (ता. पुरंदर) येथील डोंगर परिसरामध्ये अज्ञाताने लावलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. धुराचे लोट सर्वत्र पसरल्याने आगीच्या ज्वाळा भडकल्या होत्या. वाऱ्यामुळे सर्वत्र आग पसरली होती. या डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर दुर्मीळ वनसंपदा आहे. औषधी झाडेझुडपे वनसंपदा वेली खाक झाल्या. अनेक दुर्मीळ पक्ष्यांचा आदिवास धोक्यात आला, वणवा लावणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या वणव्यामध्ये असंख्य वन्यप्राणी, पशुपक्षी होरपळून गेले तर मोठ्या प्रमाणावर दुर्मीळ वनसंपदा या वनव्यात नष्ट झाली आहे.
लाठ्या-काठ्या खाऊ, गोळ्या झेलू; परंतु विमानतळ होऊ देणार नाही; ग्रास्थांचा निर्धार
येथील ओंकार सुतार, आयुष शिंदे, महेश शिंदे, बबन निगडे, उत्तम शिंदे, वसंत शिंदे, शिवम शिंदे, विजय शिंदे आदींसह ग्रामस्थांनी वणवा विझविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र दुर्गम परिसर असल्याने पटकन सुविधा उपलब्ध न झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरामध्ये लागत असलेल्या वणव्यांनी हा बहुतांश परिसर काळाकुट्ट झाला आहे. कधी वनसंपदेने नटलेले डोंगर राखेत परावर्तित झाल्याने काळेकुट्ट दिसत आहेत. अनेक दुर्मीळ वनस्पती झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पिंगोरीसह परिसरात वणवा लागण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे पर्यटनप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.