धनकवडी : बारमाही वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या भारती विद्यापीठामागील त्रिमूर्ती चौकातील वाहतुकीच्या समस्यांनी नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. वाहतूक आराखड्यानुसार चौकाचा आकार वाढवण्यात यावा, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी स्थानिक क्षेत्रीय कार्यालयासह महापालिकेला देऊन तब्बल दहा वर्षे झाले, तरीही कोणतीच उपाययोजना महापालिकेने केली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना ऐन थंडीत ही घाम निघत आहे.आकाराने अत्यंत लहान असणाऱ्या या चौकाचा वापर दिवसभरात सुमारे पन्नास हजार दुचाकी आणि चारचाकी वाहने करतात. इंग्रजी एक्स असा विचित्र आकार असलेल्या चौकातील वाहतूक नियमन करण्यात वाहतूक पोलिसांना यश आलेले नाही. चौकातील वाहतूक कोंडीला नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. त्यातच चौकाच्या धोकादायक कोपऱ्यावरील दुकानासमोर उसाचा रस पिणारे आपली वाहने रस्त्यावर उभा करून गर्दी करत आहेत. वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांना शिस्त लावावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहन चालक करीत आहेत.रस्ता रुंदीकरणासाठी पीआयसीटी महाविद्यालयाने जागा दिल्यामुळेच त्रिमूर्ती चौक ते धनकवडीचा कानिफनाथ चौकाला जोडणारा रस्ता अस्तित्वात आला. त्रिमूर्ती चौक थेट तीन हत्ती चौकाला जोडला गेल्यामुळे आंबेगावसह भारती विद्यापीठ, सहकारनगर आणि शहराशीही हक्काच्या रस्त्याने जोडले गेले. पीआयसीटी या शिक्षण संस्थेने लाखो नागरिकांवर केलेल्या उपकाराची परतफेड चौकातील दुकानदारांनी मात्र अपकाराने केली आहे.
भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागा चौक, त्रिमूर्ती चौक, सरहद्द चौक हा परिसर गेली दहा वर्षे वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेला आहे. विविध शाळा, आयटी कंपनी, खाजगी बसच्या जवळपास शंभर एक बस रोज या रस्त्यावरून ये - जा करतात. आंबेगाव, दत्तनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे काँक्रीट मिक्सर आणि ट्रकची ये - जा सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारती विद्यापीठातून जाणाऱ्या नागरिकांच्या हक्काचा रस्ता बंद झाला. - मोहिनी देवकर, स्थानिक नागरिक