अ‘जून’ भरपूर... पुढील जून महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 07:11 IST2025-05-28T07:11:42+5:302025-05-28T07:11:53+5:30
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, राज्यात पावसाचे आणखी १० बळी

अ‘जून’ भरपूर... पुढील जून महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा
नवी दिल्ली/पुणे : मे महिन्यात सलामीलाच दाणादाण उडवून देणाऱ्या पावसाची धुवांधार बॅटिंग जून महिन्यातदेखील तशीच सुरू राहणार आहे. जूनमध्ये देशातील बहुतेक भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्तच पाऊस पडण्याची शक्यता आहे. जूनमध्येच शेतकरी खरीप पिकांची पेरणी सुरू करतात. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे हवामान विभागाने मंगळवारी सांगितले. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यातील ८० टक्के भाग मान्सूनने व्यापला जाईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी पुण्यात दिली. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कायमच असून मंगळवारी राज्यातील विविध भागांत पावसाशी संबंधित घटनांत १० जण ठार झाले.
मंगळवारी मान्सूनच्या प्रवासात प्रगती झाली नाही. मात्र, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे तसेच मध्य प्रदेशातील प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पूर्वमोसमी पावसाने ओढ दिलेल्या उत्तर महाराष्ट्रातही पुढील तीन ते चार दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता वाढली आहे. जूनमध्ये १०८ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल. दक्षिणेकडील भागांत व वायव्य आणि ईशान्य भारतात कमी पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.
तीन दिवसांत ८०% राज्य व्यापणार
सध्या अरबी समुद्रात तयार झालेली प्रणाली तसेच उत्तर कोकणावर तयार झालेल्या चक्रवाताच्या स्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण छत्तीसगडवरही एक प्रणाली स्थित असून ७० अंश उत्तरेला एक कमी दाबाची द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा आणखी उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, मध्य प्रदेशातील मध्य भागात आणखी एक प्रणाली तयार झाली आहे. त्यामुळे ४८ तासांमध्ये पावसाचा जोर वाढेल. या तीव्र प्रवाहांमुळे तीन ते चार दिवसांत राज्यात ८० टक्के क्षेत्रावर मान्सूनचे आगमन झालेले असेल, असे डॉ. काश्यपी म्हणाले.
तत्काळ भरपाई द्या : मुख्यमंत्री
मुंबई : अतिवृष्टीमुळे परिस्थितीचा मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती, घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
कुठे काय घडले?
नांदेड : हदगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, पुरात मायलेकी वाहून गेल्या
वर्धा : कासारखेडा (ता.आर्वी) येथे शेतात वीज कोसळून एक ठार, दुसरा गंभीर जखमी
अहिल्यानगर : घराचा स्लॅब कोसळून तरुणीचा, कर्जत तालुक्यात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
गोंदिया : कालीमाती (ता. आमगाव) येथे शेतात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
भंडारा : पिंपळगाव (ता. पवनी) येथे शेतात वीज पडून दोघांचा मृत्यू, दोघे जखमी
चंद्रपूर : वीज पडून कामगार ठार, तीन जण जखमी
धाराशिव : जिल्ह्यात ४२ पैकी तब्बल १९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नाेंद झाली.
अहिल्यानगर : शहर जलमय, जिल्ह्यात दोन महिलांचा मृत्यू, पुराच्या पाण्यातून आठ जणांची सुटका
कोल्हापूर : धरणक्षेत्रात धुवाधार, राधानगरी ४७ टक्के तर तुळशी धरण ५२ टक्के भरले