बेरोजगारी बघा! पुण्यात नोकरी मिळवण्यासाठी ३००० इंजिनिअर रांगेत; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 19:43 IST2025-01-26T19:32:07+5:302025-01-26T19:43:00+5:30

आयटी कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी पुण्यात तरुणांच्या लांब रांगा लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

More than 3000 candidates queue for IT jobs in Pune Video viral | बेरोजगारी बघा! पुण्यात नोकरी मिळवण्यासाठी ३००० इंजिनिअर रांगेत; व्हिडीओ व्हायरल

बेरोजगारी बघा! पुण्यात नोकरी मिळवण्यासाठी ३००० इंजिनिअर रांगेत; व्हिडीओ व्हायरल

IT Jobs Unemployment: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे कॅनडातल्या भारतीयांबद्दल लोकांची चिंता वाढली होती. या व्हिडिओमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी एका रेस्टॉरंटमध्ये वेटरच्या नोकरीसाठी रांगा लावून उभे होते असं दिसत होते. कॅनडासारखचं वाढणाऱ्या बेरोजगारीचं विदारक चित्र आता राज्यातही पाहायला मिळालं आहे. पुण्यात एका आयटी कंपनीच्या मुलाखतीसाठी हजारो विद्यार्थी रांगेत उभे असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. इच्छूक उमेदवारांनी मुलाखतीसाठी तब्बल एक किलोमीटर लांब रांगा लावली होती, असं म्हटलं जात आहे. चांगलल्या  पगाराची नोकरी असणाऱ्या आयटी क्षेत्राचे भीषण वास्तव दाखवणाऱ्या या व्हिडीओमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पुण्यात सुमारे ३,००० इंजिनिअर आयटी कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी लांबलचक रांग, उन्हात उभे असलेले चिंताग्रस्त इंजिनिअर आणि आयटी सेक्टरमध्ये नोकरी मिळण्याची आशा सर्वकाही सांगून जात आहे. आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या एका कंपनीने आयटी कंपनीने थेट मुलाखती ठेवली होत्या. फक्त २०० जागांसाठी कंपनीने मुलाखत ठेवली होती असा दावा सोशल मीडियावर केला जातोय. मात्र त्यासाठी तब्बल ३००० इंजिनिअर तरुण तरुणींनी गर्दी केली होती.

व्हिडीओ पुण्यातील मगरपट्टा भागातील असल्याचं म्हटलं जात आहे. पण लोकमत याची पुष्टी करत नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतूल लोंढे यांनीही सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला.

"पुणे, महाराष्ट्र. आयटी कंपनीने २०० जागांसाठी जाहिरात दिली. हजारो इंजिनिअर  कंपनीबाहेर रांगेत उभे होते. नवीन भारतातही नोकऱ्यांची गरज आहे," असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे तरुणांची स्वप्ने उद्ध्वस्त - काँग्रेस

"व्हायरल व्हिडिओ पहा आणि देशातील तरुणांची स्थिती समजून घ्या. पुण्यातील एका कंपनीत १०० पदे रिक्त आहेत. मग काय काही वेळातच कंपनीबाहेर हजारो तरुणांची रांग लागली. यावरून देशात बेरोजगारी शिगेला पोहोचली असून तरुण वर्ग कमालीचा त्रस्त असल्याचे दिसून येते. मोदी सरकार रोजगाराबाबत खोटे दावे करते, पण हे आकडे सारे वास्तव सांगत आहेत. देशातील बेरोजगारीला कंटाळून दर तासाला २ तरुण आत्महत्या करतात. आज देशातील ८३% बेरोजगार तरुण आहेत. भारतीय तरुणांना रशिया आणि इस्रायलसारख्या युद्धग्रस्त देशांमध्ये नोकरीसाठी जावे लागते. मोदी सरकारच्या चुकीच्या आणि युवकविरोधी धोरणांमुळे तरुणांची स्वप्ने उद्ध्वस्त होत आहेत. प्रत्येक कामासाठी त्यांची धडपड आणि भटकंती सुरू आहे. नरेंद्र मोदींना तरुणांच्या भविष्याची चिंता नाही, त्यांना फक्त स्वतःची आणि आपल्या श्रीमंत मित्रांची चिंता आहे," अशी टीका काँग्रेसने केली आहे.


दरम्यान, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्याची आता आयटी हब म्हणून अशी नवी ओळख निर्माण झालीय. पुणे आणि परिसरात अनेक आयटी कंपन्या आहेत. विविध राज्यातून अनेक तरुण नोकरीसाठी पुण्याला येत असतात. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकरी मिळवण्याची स्पर्धा अशाप्रकारे तीव्र झाली आहे. दुसरीकडे, भारतात आयटी नोकरी मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक बनले आहे. बेरोजगारी आणि नोकरी मिळण्यात अडचण यांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे.

Web Title: More than 3000 candidates queue for IT jobs in Pune Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.