More PMP buses for Alandi and dehu in occasion of ashadhi ekadashi | आषाढी आली..! पीएमपीकडून आळंदी, देहूसाठी जादा बस
आषाढी आली..! पीएमपीकडून आळंदी, देहूसाठी जादा बस

ठळक मुद्दे२२ ते २६ जून या कालावधीत दररोज १४१ बसचे नियोजन प्रवासी संख्या किमान ४० असल्यास आवश्यकेतनुसारही बस सोडण्यात येणार

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत आळंदी व देहू येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. दि. २२ ते २६ जून या कालावधीत दररोज १४१ बसचे नियोजन करण्यात आले आहे.
पालखीनिमित्त पीएमपीमार्फत दरवर्षी जादा बस उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानुसार यंदाही ही व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदीसाठी स्वारगेट, मनपा, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरी रोड येथून दररोज ११२ तर देहूसाठी पुणे स्टेशन, मनपा व निगडी येथून २९ बस सोडण्यात येणार आहेत. दि. २५ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आळंदीसाठी बसची व्यवस्था असेल. याशिवाय दि. २६ जून रोजी आळंदी येथून पालखी प्रस्थान होत असल्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेश्न, हडपसर, मनपा या ठिकाणाहून जादा २८ बसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियमितपणे संचलनात असणाऱ्या ९५ बस पहाटे ५.३० वाजल्यापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बसस्थानकांवरून नेहमीच्या मार्गावर आळंदीसाठी भोससी व विश्रांतवाडीपर्यंत धावतील. याशिवाय प्रवासी संख्या किमान ४० असल्यास आवश्यकेतनुसारही बस सोडण्यात येणार आहेत. 
पुण्यातून पालखी प्रस्थानच्या दिवशी दि. ८ जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२ ते १ यादरम्यान थांबणार आहे. यादिवशी महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरुड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी आदी ठिकाणी जाण्यासाठी बस असतील. तसेच कात्रज, कोंढव्याडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा सुरू राहील. पालखी सोहळा सोलापूर व सासवड मार्गाने प्रस्थान झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुक टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. हडपसर ते दिवेघाट हा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहणार असल्याने त्याकाळात बोपदेव घाट मार्गे वाहतुक सुरू ठेवली जाणार आहे. या मार्गावर स्वारगेट, पुणे स्टेशन व हडपसर येथून ६६ बसचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.


 


Web Title: More PMP buses for Alandi and dehu in occasion of ashadhi ekadashi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.